महिला टी-20 विश्वचषक, हिंदुस्थानी संघ भिडणार बांगलादेशला

111

सलामीच्या विश्वचषक लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला हिंदुस्थानी महिला संघाने पराभवाचे पाणी पाजले होते. त्यामुळे उंचावलेल्या मनोधैर्याने टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी -20 विश्वचषकातील आपल्या दुसऱया साखळी लढतीत बांगलादेशला भिडणार आहे.बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक हिंदुस्थानी संघ मुळीच करणार नाही. कारण याच संघाने 2018 मध्ये बलाढय़ हिंदुस्थानला दोनदा पराभवाचा धक्का दिलेला आहे.

आज पर्थमध्ये यंदाच्या महिला टी-20 चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश संघाला पराभूत करीत स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवण्याचे हिंदुस्थानी संघाचे लक्ष्य आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्मा आणि मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज टीम इंडियाच्या सदस्य नव्हत्या. पण यंदा त्यांना आपला धडाका दाखवत बांगलादेश विरुद्धच्या मागच्या पराभवाचे उट्टे फेडण्याची सुवर्णसंधी उद्या लाभणार आहे. शिवाय पहिल्या लढतीत विशेष फॉर्मात नसलेली कर्णधार हरमनप्रीत कौर आणि महाराष्ट्राची धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना यांना सूर गवसल्यास हिंदुस्थानी संघाला सलग दुसरा विजय मिळवणे कठीण होणार नाही.

पूनम, शिखा पांडेंवर गोलंदाजीत मोठी आशा
ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी उद्ध्वस्त करणारी डावखुरी फिरकीपटू पूनम यादव आणि मध्यमगती गोलंदाज शिखा पांडे यांनी चमकदार कामगिरी करावी अशी प्रार्थना हिंदुस्थानी चाहते करीत आहेत. गोलंदाज भरात आले तर हिंदुस्थानी संघासाठी पुढच्या सर्व साखळी लढती सोप्या ठरतील एवढे मात्र निश्चित.

बांगलादेशच्या या खेळाडूंना रोखणे महत्त्वाचे
प्रतिस्पर्धी संघाची सलामीची फलंदाज फरगना हक आणि अष्टपैलू जहांनारा आलम यांच्यासह अनुभवी खेळाडू कर्णधार सलमा खातून यांना नियंत्रणात ठेवणे हिंदुस्थानी संघाला जमले तर उद्या संघाचा दुसरा विजय निश्चित आहे. कारण टी-20 त शतक साकारणारी फरगना हक हिंदुस्थानसाठी धोकादायक ठरू शकते.

प्रतिस्पर्धी संघ
हिंदुस्थान ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, पूनम यादव, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टिरक्षक ), हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, ऋचा घोष, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर.

बांगलादेश ः सलमा खातून (कर्णधार), रूमाना अहमद, आयशा रहमान, फहिमा खातून, फरगना हक, जहानारा आलम, खदिजा तुल कुबरा, सोभना मोस्तरी, मुर्शीदा खातून, नाहिदा अख्तर, निगार सुल्ताना (यष्टिरक्षक ), पन्ना घोष, ऋतू मोनी, संजीदा इस्लाम, शमीमा सुल्ताना.

– फलंदाजीत सुधारणा आवश्यक
गेल्या काही स्पर्धांत हिंदुस्थानी महिला संघाच्या हरमनप्रीत आणि स्मृती मंधाना या प्रमुख फलंदाजांना विशेष कामगिरी नोंदवता आलेली नाही. यंदा सलामीच्या विश्वचषक लढतीतही त्या दोघी अपयशी ठरल्या होत्या. दीप्ती शर्माने 46 चेंडूंत 49 चेंडूंची खेळी साकारत हिंदुस्थानी धावसंख्येला चांगला आकार दिला होता. अन्यथा सव्वाशे धावांचा पल्लाही संघासाठी कठीण होता. त्यामुळे हिंदुस्थानी महिलांना स्पर्धेत आपल्या फलंदाजीचा दर्जा खूपच उंचावावा लागेल. अन्यथा या स्पर्धेत त्यांची डाळ शिजणार नाही. मात्र नवोदित जेमिमा आणि शेफाली यंदा चांगल्याच फॉर्मात आहेत ही हिंदुस्थानी संघासाठी दिलासा देणारी बाब आहे. हरमनप्रीत, स्मृती यांच्या कामगिरीकडेही उद्या हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांचे लक्ष लागलेले असेल.

आपली प्रतिक्रिया द्या