कर्नाटकचे शेपूट वाकडेच – बोम्मई यांचा आडमुठेपणा कायम, महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही!

आपले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही. कोणतीही तडजोड करणार नाही. महाराष्ट्रातील कन्नडिगांच्या संरक्षणासाठी खबरदारी घेतली आहे.

महाराष्ट्रातील मिंधे सरकार कोणतेही ठोस प्रत्युत्तर देत नसल्यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज बरळत असून, त्यांचा आडमुठेपणा कायम आहे. ‘आपले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही. कोणतीही तडजोड करणार नाही,’ असे बोम्मई यांनी सांगितले. त्यामुळे कर्नाटकाचे शेपूट वाकडे ते वाकडेच असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

महिनाभरापासून मुख्यमंत्री बोम्मई सतत वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत आणि महाराष्ट्रातील मिंधे सरकार शांतपणे पाहत असल्याचे चित्र आहे. बोम्मई यांनी सुरुवातीला  जत आणि अक्कलकोट तालुक्यातील गावांवर दावा केला. जत तालुक्यात पाणी सोडले. ‘महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाय ठेवू देणार नाही,’ अशी धमकी दिली. कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केला. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पह्नवरून चर्चा केली आणि या वादात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केल्याची माहिती दिली होती. याबाबत आज पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री बोम्मई संतापले.

नड्डांशी बोललो; शहांशी चर्चा नाही

मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून माझे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. कर्नाटकाकडून महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही. याप्रकरणी कोणतीही तडजोड करणार नाही, असे मी त्यांना सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही, असे बोम्मई म्हणाले.

नड्डा यांनी शिंदेंना सांगितले, शांत रहा!

मी भेटल्यानंतर भाजप अध्यक्ष नड्डा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितले आहे, असा गौप्यस्फोटही बोम्मई यांनी केला. महाराष्ट्रात असलेल्या कन्नडिगांच्या संरक्षणासाठी खबरदारी घेतली आहे. याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांशी चर्चा केल्याचा दावाही बोम्मई यांनी केला.