शब्दांचा मार सोसंना

103

<< टिवल्या बावल्या >>    << शिरीष कणेकर >>

कोणाचा वार जास्त खोलवर यावर सुरा, चाकू, जांबिया, कट्यार यांच्यात जुंपली होती. मागे बसून शब्द गालातल्या गालात हसत होते. कोणी सांगितलंय, शोधलंय, बनवलंय मला माहीत नाही, पण हे निःसंशयपणे त्रिकालअबाधित सत्य आहे.शस्त्रांनी केलेली जखम भरून येऊ शकते, फार तर व्रण राहतो. शब्दांनी केलेल्या जखमेचा व्रण दिसत नाही, पण जखम कधीही भरून येत नाही. खोलवर केलेल्या जखमेनं एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. शब्दांच्या वारानंतर माणूस जिवंत राहतो, पण मरेपर्यंत त्याच्या जीवाचा तडफडाट होत राहतो. ज्याला काही कळतं तो हेच म्हणेल की सुऱ्याचा वार परवडला, पण विषारी शब्दांचा हल्ला नको. शरीरापेक्षा मन कितीतरी जास्त संवेदनशील असतं म्हणून मनावरील हल्ला सहन होत नाही.

मी शब्दांच्या जंगलात राहतो आणि तरीही शब्दांना घाबरतो. बोलणारा बोलून जातो; इकडे आपण विव्हल होतो. चार-पाच दशकं झाली असतील या घटनेला. मुलुंडच्या एका कंपनीत मी ‘कॉस्टिंग’चा ट्रेनी म्हणून इंटरव्हय़ूला गेलो होतो. मला काही तास बसवून ठेवण्यात आलं. अखेर ती घडी आली. मुलाखत घेणाऱ्यांनं उभ्या उभ्या मला एकच प्रश्न विचारला, ‘‘काय स्टायपेंड घेशील?’’ ‘‘तीनशे.’’ मी चाचरत म्हणालो, ‘‘याहून जास्त मी अपेक्षा ठेवणंही बरोबर नाही.’’‘‘एवढेही कोणी तुला देणार नाही.’’ तो ताडकन म्हणाला व निघून गेला. मला ‘ट्रेनी’ म्हणूनही नोकरी मिळाली की नाही ते कळलं नाही, पण माझी तीनशे रुपये पगार मिळविण्याचीही लायकी नाही हे कळलं. हे तो नसता बोलला तरी चाललं असतं. दोन मिनिटांच्या भेटीत त्याला माझी योग्यता कळली होती? अन् लगेच ती माझ्या तोंडावर बोलून दाखवायची त्याला घाई झाली होती. त्याचा मला दुखावण्याचा हेतू होता असं आजही मला वाटत नाही. दुखावण्याइतकीही मला किंमत देण्याची त्याला गरज नव्हती. त्यानं माझं नाव, वय, शिक्षण हेदेखील विचारलं नव्हतं. शिपायाच्या पोस्टसाठीही त्याने अधिक विस्तृत मुलाखत घेतली असती. पण तो सहज म्हणून बोलून गेला आणि माझं कर्तृत्व उमलण्यापूर्वीच कोणी माझा पाणउतारा करून माझं खच्चीकरण केलं होतं. तीनशे रुपये पगार घेण्याचीही माझी लायकी नाही हे त्या माणसाचे उद्गार पुढे कितीतरी वर्षे मला छळत होते अन् ते सहजोद्गारच नव्हे व दस्तुरखुद्द मीदेखील त्याच्या खिजगणतीत नसू हा विचारही दीर्घकाळ मला सतावीत राहिला.

माझ्या वृत्तपत्रीय कार्यालयात माझा आतेभाऊ आला होता. त्याला संपादकाला भेटायची इच्छा झाली. त्याने त्यांचं नाव ऐकलं होतं.

‘‘हो, त्यात काय?’’ माझा आत्मविश्वास पाहून नियती हसली असावी.

मी केबिनचं दार लोटून आत गेलो. पाठोपाठ माझा आतेभाऊ होता.

संपादकांनी मान उचलून वर पाहिलं व ते खेकसले, ‘‘तुम्हाला दरवाजावर टक टक करून आत येता येत नाही? सरळ आत कसे घुसता तुम्ही? काही मॅनर्स आहेत की नाहीत?’’

मी धडपडत खोलीतून बाहेर पडलो. माझ्यापाठोपाठ माझा आतेभाऊ बाहेर पडला. माझा चेहरा पार उतरला. (असावा.) माझा नुसताच अपमान झाला नव्हता, तर तो आतेभावासमोर झाला होता.

‘‘अरे, तू परवानगी विचारून आत जायचंस.’’ माझ्या जखमेवर मीठ चोळत आतेभाऊ म्हणाला.

मी गप्प बसलो. त्याला आता कुठं सांगत बसू की माझं सर्रास आत केबिनमध्ये जाणंयेणं होतं. संपादकांशी उत्तम, खेळीमेळीचे संबंध होते. आजवर असा प्रसंग माझ्यावर कधीही ओढवला नव्हता. नेमकं आज काय झालं असेल? काहीही झालं असू दे, माझा कचरा झाला होता. तोही आतेभावासमोर, त्याच्या साक्षीनं. माझी काय वट आहे याविषयी त्यानं मनाशी बांधायची ती खूणगाठ बांधली असणार. मी मनात कुढत बसलो.

महिना पंधरा दिवसांनी मला संपादकांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रसंग आला. मी दारावर टकटक केलं.

‘‘कोण आहे?’’ आतून डरकाळी आली.

मी स्वतःची नगण्य ओळख सांगितली व पडलेल्या चेहऱ्यानं आत दाखल झालो.

‘‘कमाल करता राव तुम्ही.’’ संपादक प्रसन्नपणे म्हणाले, ‘‘दारावर टक टक काय,  ‘मे आय कम इन’ काय, चालवलंय काय? आपल्यात या मॅनर्स कधी आल्या? बसा बसा, चहा घ्या.’’

मी हंबरडा फोडण्याच्या बेतात होतो. वाटलं असंच धावत पुण्याला जावं व आतेभावाला घेऊन यावं. त्याच्यापुढे गवऱ्या वेचल्या होत्या; आता फुलं वेचताना त्याला दाखवावं.

मी बाहेर आल्यावर संपादकांचा शिपाई मला कुजबुजून म्हणाला, ‘‘त्या दिवशी ते ‘ताज’मध्ये गेले होते.’’

‘‘म्हणजे?’’ मी गोंधळून विचारले.

‘‘म्हणजे ते ‘ताज’मधून पिऊन आले होते. नेमके तेव्हाच तुम्ही आत गेलात.’’

माझ्या मनात आलं की जगात येण्याचं ‘टायमिंग’ एकदा चुकलं की पुढली सगळी ‘टायमिंग’ चुकतच जातात. (नाही, मी सूचकपणे लग्नाविषयी बोलत नाही.)

माझा सहकारी व मित्र अरुण साधू ‘फ्री प्रेस जर्नल’चा संपादक झाला तेव्हाही मी दारावर टकटक करूनच आत गेलो. साधू बिचारा एकदमच मवाळ होता. पण म्हटलं हाही ‘ताज’ला जाऊन आलेला असेल तर? यू नेव्हर नो. मी ‘ताज’चाही धसका घेतला होता.

shireesh.kanekar @gmail.com

 

आपली प्रतिक्रिया द्या