शौचालयाचे स्वप्न एका ट्विटने पूर्ण; समस्येचा झाला झटपट निपटारा

सामना ऑनलाईन । पैठण

छोटय़ाशा गावातील एका खेडुताने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हॅण्डलवर तक्रार केली. शौचालय अनुदानाला होणाऱ्या विलंबाची व्यथा मांडली आणि आश्चर्य! केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयचे (नवी दिल्ली) उपसचिव उदय सिन्हा यांनी गावात येऊन या तक्रारीचा आढावा घेतला. लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्यांचा निपटारा केला. गल्लीतील प्रश्न दिल्लीतून सोडवण्यात आल्याची ही सुखद घटना पैठण तालुक्यातील निलजगाव येथे घडली.

रमेश गोजे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हॅण्डलवर ट्विट केले. तपशीलवार तक्रार केली. एवढेच नव्हे तर स्वच्छ भारतचा गवगवा आणि शौचालये मिळण्यास येणाऱ्या प्रशासकीय अडचणींचा लेखाजोखा मांडला. अत्यंत आकश्यक क गरजेची असलेली ही योजना गतिमान करण्याबाबत त्यांनी विनंती केली. याची तत्काळ दखल घेण्यात आली. ट्विटरवर असलेल्या तक्रारीचे स्क्रीनशॉट घेऊन पैठण पंचायत समितीच्या स्वच्छता विभागाला पत्र पाठविण्यात आले. दिल्ली मंत्रालयातून आलेल्या या पत्रानंतर तांत्रिक दोष दूर करून तक्रारदार रमेश गोजे यांना अनुदान देण्यात आले. त्यांचे शौचालय बांधकामही पूर्ण झाले आहे.