व्यायाम सवयीचा!

>> वरद चव्हाण

शंतनु मोघे. संयत अभिनय आणि पिळदार शरीरयष्टी. व्यायामाची आवड वडिलांमुळे लागली.. जी आज सवय झाली आहे.

dनमस्कार, फिटनेस फ्रिक्स व्यायाम चालू आहे ना? अजूनही नसेल केलात तर आजचा लेख एका अशा कलाकाराचा आहे ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारी व्यक्तिरेखा मालिकेच्या माध्यमातून साकारली. होय, ही भूमिका म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. प्रत्येक कलाकार एका अशा प्रोजेक्टची वाट बघत असतो. ज्या प्रोजेक्टमुळे त्या कलाकाराच्या नावामागे सक्सेसचा स्टॅम्प बसतो. अनेक वर्षांचा स्ट्रगल असा एखादा प्रोजेक्ट संपवून टाकतो, पण हा सक्सेस तुम्हाला महाराजांची भूमिका साकारून मिळणार असेल तर एकीकडे आपण महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार आहोत याचा प्रचंड अभिमान असतो तर दुसरीकडे एका फार मोठय़ा जबाबदारीचे दडपण कलाकारावर येते. महाराजांच्या तोंडी येणारे प्रत्येक वाक्य खूप विचारपूर्वक प्रेक्षकांसमोर मांडावे लागते. एखादे वाक्य किंवा महाराजांची देहबोली चुकीच्या पद्धतीने सादर केली तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा रोष ओढवून घेऊ याची भीती त्या कलाकाराला असतेच. अशा आभाळाएवढय़ा कर्तृत्ववान राजाची भूमिका ‘संभाजीराजे’ या मालिकेतून सादर करून आपल्या सर्वांची मनं जिंकणारा व आजच्या पिढीसमोर शिवाजीराजे जिवंत करणारा ‘शंतनू मोघे’ हा आजचा आपला सेलिब्रिटी आहे. शंतनूला व्यायामाची आवड त्याच्या मनात ज्यांनी रुजवली ते म्हणजेच त्याचे बाबा ‘श्रीकांतजी मोघे’. श्रीकांतजी स्वतः लहान असताना कोल्हापूर, सांगली भागांतून कुस्तीत भाग घेत होते. त्यांची मुलांना अशी शिकवणच होती की, चांगले आयुष्य जगायचे असेल तर व्यायाम हा केलाच पाहिजे. श्रीकांतजींना (जिम) व्यायामशाळेत जाण्यापेक्षा आपल्या मातीतले व्यायाम म्हणजेच सूर्य नमस्कार, जोर बैठका, दंड बैठका मारायला आवडत असत. शंतनूलासुद्धा त्यांचे म्हणणे पटते. कारण व्यायामशाळेत आपण पटकन शरीर नक्कीच कमवतो, पण व्यायामात थोडी जरी गॅप गेली तर पटकन शरीर उतरतेसुद्धा. पण मातीतला व्यायाम जर आपण पूर्ण निष्ठsने केला तर आपले शरीर बराच काळ शेपमध्ये राहते. बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत शंतनू अभिनय क्षेत्रात आलाच, पण त्याचबरोबर तो नित्यनेमाने व्यायामसुद्धा करू लागला. शंतनूला पोहण्याचीसुद्धा फार आवड आहे. पोहणे हा एक असा खेळ आहे ज्यात तुमची टोटल बॉडी वर्कआऊट होते. शंतनू गोरेगावला राहत असताना गोल्ड जिममध्ये जायचा. आता मीरा रोडला शिफ्ट झाल्यावर लाईफ फिटनेस ट्रस्ट नावाच्या व्यायामशाळेत जातो. व्यायाम माझी गरज नसून मला व्यायामाची सवय लागली आहे हे तो आवर्जून सांगतो. शिवाजी महाराजांची भूमिका मिळणे शंतनूच्या नशिबातच होती.

कारण जेव्हा महाराजांची भूमिका शंतनूच्या पदरात पडली तेव्हा दिग्दर्शकाला अपेक्षित असलेले शरीर शंतनूनी आधीच कमावून ठेवले होते. त्यामुळे महाराजांच्या फिजिकल प्रेझेंन्समध्ये शंतनू आधीच पास झाला होता. मी मागच्या एका लेखात तुम्हाला सांगितले होते की, ‘सोयराबाई’ची भूमिका साकारताना स्नेहलता वसईकरला सांगण्यात आले होते की, एका पॉइंटला सोयराबाईंचे वय दाखवण्यासाठी वजन वाढवावे लागले. तसेच शंतनूच्या बाबतीतसुद्धा झालेच. महाराजांचे वय दाखवण्यासाठी थोडे वजन वाढवावे लागले. कुठल्याही कलाकारासाठी वजन वाढवणे हे एक मोठे आव्हानच असते. कारण वजन वाढताना लगेच वाढते, पण वजन कमी करायला किती काळ जाईल याचा खरे तर अंदाज कोणालाच येत नाही, पण तुम्हाला मिळालेली भूमिकाच जर वजनदार असेल तर तुम्ही मागचा पुढचा कसलाही विचार न करता होकार देऊन टाकता. शेवटी हे महाराजांवरचे प्रेम आणि भक्ती आहे. वजन वाढविण्यासाठी जंकफूड टाळून शंतनू पौष्टिक पदार्थ जास्त खाऊ लागला. शूटच्या व्यस्त शेडय़ुलमध्ये व्यायाम करणे कठीण होत असले तरी त्याच्या आहारावर त्याचे बारीक लक्ष होते. या सगळय़ामध्ये त्याचे पर्सनल ट्रेनर नीलेश सावंत यांनी शंतनूची खूप मदत केली. काय मग, कसा वाटला आजचा लेख? एक गोष्ट विसरू नका. महाराजांच्या राज्यात नुसते मावळे नाही तर स्त्र्ाया पण सशक्त होत्या, स्वावलंबी होत्या. महाराजांसाठी, स्वराज्यासाठी मोठमोठय़ा शत्रूला सामोरे जाण्याची क्षमता जेवढी महाराजांच्या मावळय़ांमध्ये होती तेवढीच स्त्र्ायांमध्येसुद्धा होती. कारण ते मानसिक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम होते. म्हणूनच म्हणतो आता पुरुषांनी महाराजांचा आणि स्त्र्ायांनी माँसाहेब जिजाऊंचा हा आदेश समजावा आणि व्यायामाला सुरुवात करावी.

जगदंब.

vcvarad8@gmail.com