हुकूमशाही सरकारला धडा शिकविण्यासाठी एकजुटीने काम करा, आमदार भास्कर जाधव यांचे आवाहन

सध्या राज्यात, देशात ईडी, सीबीआय, न्यायालय यासारख्या स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संविधानाप्रमाणे अभिप्रेत असलेली खरीखुरी लोकशाही मोडीत काढण्याचा, लोकशाही संपविण्याचा घाट देशातील राज्यकर्त्यांनी घातला आहे. या मुजोर, अहंकारी, हुकुमशाही सरकारला धडा शिकविण्यासाठी एकत्रित काम करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केले.

नाशिक येथे बुधवारी संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भास्कर जाधव बोलत होते. शिवसेनेने कधीही जातपात पाहिली नाही. ज्याच्या खांद्यावर भगवा ध्वज तो आमचा, ही आमची भूमिका राहिली. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेचा विचार एकच आहे, दोघांची कार्यपद्धती सारखीच आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या तरुणांची ताकद एकत्र आल्याने राजकीय परिस्थिती बदलण्यास निश्चितच मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, शिवसेना उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना विसरता येणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोघेही महापुरूष आहेत. ते एकमेकांबद्दल काय बोलले हा इतिहास सांगण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण लोकशाहीत वावरतो याचे भान ठेवायला हवे असे मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.