कामगार केसरी कुस्ती – नामदेव केसरे, संग्राम साळुंखे, विकास पाटील यांची आगेकूच

255

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित ‘कामगार केसरी’ व ‘कुमार केसरी’ स्पर्धेचा दुसरा दिवस रोमहर्षक लढतीने गाजला. मानाच्या ‘कामगार केसरी’साठी झालेल्या लढतीत तात्यासाहेब कोरे वारणानगरचा नामदेव केसरे व डॉ. जी. डी. बापू लाड कुंडलचा महेश मदने यांच्यातील लढत चुरशीची झाली. दोन्ही मल्लांनी डाव-प्रतिडाव टाकत एकमेकांना चांगलेच झुंजविले. अखेर तांत्रिक गुणांवर नामदेव केसरेने बाजी मारली.

गतवेळचा ‘कामगार केसरी’ उपविजेता जवाहर सह. सा. कारखान्याचा यासिन मुजावर व डॉ. जी. डी. बापू लाड, कुंडलचा विजय शिरसाठ यांच्यातील लढत उत्कंठावर्धक ठरली. दोघांनीही आपले कसब पणाला लावत एकमेकांना अस्मान दाखवण्याचा प्रयत्न केला. अखेर मुजावरला चित्रपट करीत शिरसाठ याने विजयी सलामी दिली.

‘कुमार केसरी’करिता झालेल्या लढतीत भोगावती सह. सा.का.चा सरदार बरगे व सदगुरू सह. सा.का.चा योगेश कपने यांच्यातील लढत चांगलीच रंगली. भोगावतीचा मल्ल सरदार बरगे याने सुरुवातीपासूनच आक्रमकपणे  डाव टाकत त्याची दमछाक केली. अखेर तांत्रिक गुणावर सरदारने बाजी मारली. तर ५७ किलो वजनी गटात कुंभी कासारीचा भिकाजी पन्हाळकर व क्रांती सह. कुंडलचा उमेश मदने यांच्यातील लढत चुरशीची झाली. दोन्ही मल्लांनी पहिल्या डावात ६-६ अशी बरोबरी साधत एकमेकांना चांगले झुंजविले. दुसऱ्या डावात पन्हाळकरने १०-८ अशी बाजी मारत मदनेवर मात केली.

 

वजनी गटातील उपांत्य फेरीचे निकाल

गट २ रा (६१ कि.) – सचिन पाटील (कुंभी कासारी) विजयी वि. प्रकाश पाटील, दिलीप शेंबडे (सद्गुरू सह. सा. सांगली) विजयी वि. श्रीरंग पाटील (यशवंत ग्लुकोज); गट ३ रा (६५ कि.) – आफताब पठाण (कुंभी कासारी) विजयी वि. अनिकेत घाटकर (दुधगंगा), अमोल पवार (डॉ. जी. डी. बापू लाड) विजयी वि. अक्षय शाराबिद्रे (दुधगंगा);

गट ४  (७० कि.) – दिग्विजय जाधव (तात्यासाहेब कोरे) विजयी वि. नवनाथ गोटम (कुंभी कासारी); अनिकेत पाटील (तात्यासाहेब कोरे) विजयी वि. रवींद्र नांदिवले (कुंभी कासारी).

आपली प्रतिक्रिया द्या