24 लाखांची रोकड व मालकाची दुचाकी चोरली; तिघांना अटक

300

कटिंग टूलच्या दुकानात काम करीत असताना नोकराची नियत फिरली आणि तो दुकानातील 24 लाख 29 हजारांची रोकड आणि मालकाची ऑक्टिव्हा दुचाकी घेऊन पसार झाला. मुंबई सोडून त्याने पुणे गाठले. पण जे.जे. मार्ग पोलिसांनी अचूक तपास करीत त्याच्या मुसक्या आवळून त्याला साथ देणाऱ्या दोघांनाही अटक केली.
जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अस्लम (नाव बदलेले) यांचे कटिंग टूलचे दुकान आहे. त्यांच्याकडे मोहम्मद अफजल मोहम्मद रोज अली खान (19) हा कामाला होता. दुकानात मोठय़ा प्रमाणात असणारी रोकड पाहून अफजलने चोरी करायचे ठरवले. त्यानुसार त्याने मोहम्मद अमीर मोहम्मद अतीक खान (27) आणि मोहम्मद रिजवान अली रजा खान (24) या दोघांना हाताशी घेतले. मग तिघांनी मिळून 14 ऑगस्ट रोजी संधी साधून दुकानातील जवळपास 25 लाखांची रोकड आणि मालकाची दुचाकी चोरून पळ काढला. याप्रकरणी अस्लम यांनी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर एसीपी अविनाश धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय फरीद खान, उपनिरीक्षक घेवडेकर व पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बांबींचा अभ्यास करून शोध घेत असताना अफजल पुण्यात तर अन्य दोघे जे.जे. मार्गच्या हद्दीतच असल्याची माहिती खान यांना मिळाली. मग पथकाने पुणे गाठून अफजलच्या तर अन्य दोघांच्या परिसरातून मुसक्या आवळल्या. आरोपींकडून 18 लाखांची रोकड आणि ऑक्टिव्हा दुचाकी हस्तगत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या