हिंदुस्थानचा विकासदर घटण्याचा जागतिक बँकेचा अंदाज

517

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर (आयएमएफ) आता जागतिक बँकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या हिंदुस्थानच्या विकासदरात आणखी घसरण होणार असल्याचा आंदाज वर्तवला आहे. 2019-20 मध्ये हिंदुस्थानचा विकासदर 6 टक्क्यांपर्यंत घसरेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. गेल्या आर्थिक वर्षात हिंदुस्थानचा विकासदर हा 6.9 टक्के इतका होता. तर 2022 पर्यंत हिंदुस्थानचा आर्थिक विकासदर वेग पकडेल आणि विकासदर 7.2 टक्क्यांपर्यंत पोहचेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

आयएमएफने याच आठवड्यात हिंदुस्थानचा या वर्षाचा आर्थिक विकासदर घसरणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आयएमएफने 0.30 टक्क्यांनी विकासदर घटवून 7 टक्के होईल असा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने हिंदुस्थानचा विकासदराचा अंदाज 6.8 टक्क्यांवरून कमी करून 6.1 टक्के इतका केला होता. देशांतर्गत मागणीत घट झाल्याने आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीत असल्याने त्याचा परिणाम हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचे अहवालात म्हटले होते. आयएमएफ आणि जागतिक बँकेची वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2017-18 मध्ये हिंदुस्थानचा विकासदर 7.2 टक्क्यांवर पोहोचला होता. हा विकासदर 2018-19 मध्ये 6.8 टक्क्यांपर्यंत घसरला होता. आता त्यात आणखी घसरण होऊन विकासदर 6 टक्के होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात औद्योगिक उत्पादनाच्या विकासदरात वाढ झाली आहे. औद्योगिक उत्पादन आणि रियल इस्टेट क्षेत्राचा विकासदर 6.9 टक्क्यांवर गेला आहे. तर कृषी विकासदर 2.9 टक्के आणि सेवा क्षेत्राचा विकासदर 7.5 टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेने आपल्या अहवालात वर्तवला आहे. विकास दरात घसरण होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात विकासदर 6.9 टक्के होता. त्याआधीच्या वर्षात 2017-18 मध्ये विकास दर 7.2 टक्के होता.

2021 मध्ये विकासदर वेग पकडून 6.9 टक्के आणि 2022 मध्ये विकासदर 7.2 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असे जागतिक बँकेने म्हटले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीचा परिणाम विकास दरावर झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर ताण असून शहरी भागात बेरोजगारी वाढली आहे. कॉर्पोरेट करात कपात केल्यामुळे गुंतवणूक वाढेल असे भाकीतही अहवालात वर्तवण्यात आले आहे. दक्षिण आशियात एकूणच विकासदर मंदावण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2019 मध्ये हिंदुस्थानपेक्षा बांगलादेश, नेपाळ जास्त वेगाने प्रगती करतील. पाकिस्तानच्या विकास दरात 2.4 टक्क्यापर्यंत घसरण होईल असा अंदाजही या अहवालात वर्तवण्यात आले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावली असून हिंदुस्थानसारख्या विकसनशील बाजारपेठांमध्ये यावर्षी मंदीचे परिणाम ठळकपणे दिसून येतील असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.त्यानंतर आता जागतिक बँकेनेही हिंदुस्थानचा विकासदर घटण्याचा अंदाज वर्तवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या