गरीबच राहा किंवा धोरण बदला! वर्ल्ड बँकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा

दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान सध्या भीषण आर्थिक परिस्थितीत आहे. आर्थिक कर्जबाजारी, वाढलेली महागाई आणि बेरोजगारी, त्यात अस्थिर राजकीय स्थिती यांमुळे तिथली जनता त्रस्त झाली आहे. त्यात वर्ल्ड बँकेने पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला आहे. एकतर गरीब राहा किंवा मग मार्ग बदला, असा इशारा वर्ल्ड बँकेने दिला आहे.

पाकिस्तानला इशारा देताना जागतिक बँकेने त्यांना राष्ट्रीय धोरण बदलण्याचा पर्याय सुचवला आहे. पाकिस्तान संकटाच्या त्या अत्युच्च बिंदूपर्यंत पोहोचला आहे, जिथे त्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. पाकिस्तानला हे ठरवावं लागेल की, तो सैन्य, राजकीय नेते आणि व्यापारी गुंतवणूकदार यांच्या स्वार्थाने प्रेरित असलेले निर्णय घेऊन 40 टक्के द्रारिद्र्य रेषेखालील जनतेसह गरीब बनून राहणार आहे, किंवा आपली धोरणं बदलून उज्ज्वल भविष्याचा विचार करणार आहे.

पाकिस्तान मानव संसाधन साठा आणि आर्थिक संकट यामधील दोलायमान अवस्थेत आहे. पाकिस्तानात निवडणुका होणार असून त्यापूर्वी पाकिस्तानने निर्णय घ्यावा, असा इशारा बँकेने दिला आहे. आंतरराष्ट्रीय कर्जदार आणि विकासातील भागीदार फक्त आर्थिक बाबतीत सल्ला देऊ शकतात. पण, देशांतर्गत घडी बसवण्यासाठी कठीण पर्याय निवडणं आणि त्यानुसार सुधारणा करणं हा निर्णय फक्त देशच घेऊ शकतो. हा पाकिस्तानच्या धोरणबदलाचा निर्णायक क्षण ठरू शकतो, असं वर्ल्ड बँकेने म्हटलं आहे.