रक्तदान…मदतीचा सेतू

303

शुभांगी बागडे

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे सांगितले जात असले आणि त्यासंदर्भात आता बऱयापैकी जागृती झाली असली तरी रक्तदानाचे कार्य एक व्रत म्हणून करणाऱया संस्था आणि व्यक्ती यांची संख्या आजही तुलनेने कमीच आहे. अशाच दोन रक्तदान सेवाव्रत  माहिती… १४जूनच्या जागतिक रक्तदान दिवसानिमित्त…

रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या मालतीला अत्यंत दुर्मिळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रक्ताची गरज असल्याचा निरोप विक्रम यादवला मिळाला. रक्त मिळाले नाही तर मालती व बाळ वाचणे कठीण आहे हे डॉक्टरांना समजले होते. तासगावला राहणारे विक्रम यादव निरोप मिळताच तात्काळ मोटारसायकलवरून निघाले व पहाटे सहा वाजता मालतीने गोजिरवाण्या बाळाला जन्म दिला आणि डॉक्टरांच्या व विक्रमच्या चेहऱयावर समाधान उमटले. रक्तदान करून आनंद व समाधान मिळवणे याचा अनेकदा विक्रम यादव यांनी अनुभव घेतला आहे.

माणुसकीची आणि मदतीची भावना जपणारे विक्रम यादव हे दुर्मिळ समजल्या जाणाऱया ‘बॉम्बे ओ’ ब्लड ग्रुपचे आहेत. स्वतःच्या जीवापेक्षाही दुसऱयाच्या जिवाचा विचार करत विक्रम यादव यांनी आतापर्यंत ४२ जणांचे प्राण वाचवले आहेत. तासगावमधील विक्रम यादव हे खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. चितळे डेअरीमध्ये वाहनचालक म्हणून काम करणाऱया विक्रम यांनी स्वतःच्या खर्चाने प्रवास करत रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. वृत्तवाहिनी, सोशल नेटवर्किंग ग्रुप, एखाद्या हॉस्पिटलमधून आलेला फोन अशा कोणत्याही माध्यमांद्वारे विक्रम यांच्याशी रक्तासाठी संपर्क साधला की, ते कशाचीही वाट न पाहता तत्काळ मदतीसाठी हजर होतात. रत्नागिरीतील बाळ-बाळंतिणीला वाचवतानाही त्यांनी अशीच तत्परता दर्शवली.

विक्रम यांना आपला रक्तगट १९९६ साली समजला व त्याचे महत्त्वही लक्षात आले. हे लक्षात आणून देणारी अप्रिय घटना त्यांच्या आयुष्यात घडली. १९९५ साली त्यांच्या एका मित्राचा मोठा अपघात झाला. जीवन-मरणाच्या रेषेवर अडकलेल्या त्यांच्या मित्राचा रक्तगटही ‘बॉम्बे ओ’ हा होता. मात्र त्यावेळी विक्रम यांना स्वतःच्या रक्तगटाविषयी कल्पना नव्हती. रक्ताअभावी त्यांच्या मित्राचा मृत्यू झाला. त्यानंतर रक्तदानाविषयी जागरुक झालेल्या विक्रम यांना एका रक्तदानाच्या वेळी आपला रक्तगट ‘बॉम्बे ओ’ असल्याचे लक्षात आले व त्यांचे डोळे पाणावले. ही गोष्ट काही दिवसांपूर्वी कळली असती तर आपल्या मित्राचे प्राण वाचले असते याची जाणीव त्यांना झाली. आपल्या या मित्राला आदरांजली म्हणून विक्रम सतत रक्तदानासाठी तत्पर राहतात. जी गोष्ट आपल्या मित्राच्या बाबतीत झाली ती इतरांबाबत होऊ नये यासाठी ते धडपडत आहेत.

विक्रम यांनी महाराष्ट्र व अन्य राज्यातील दुर्मिळ गटातील लोकांचा गट तयार करून मदतीचा सेतू तयार केला आहे. या ग्रुपद्वारे रत्नागिरी, नांदेड, नाशिक, मुंबई या शहरांसह मलेशिया, कोलंबिया अशा परदेशातील रुग्णांनाही हे रक्त पोहोचवून मदत केली आहे.

दहा लाख लोकांच्या मागे केवळ चार जण इतके अत्यल्प प्रमाण असणारा ‘बॉम्बे ओ’ हा रक्तगट. त्यामुळेच याचे महत्त्व ओळखून गरजू रुग्णांना रक्तदान करत मदतीला धावून जाणाऱया विक्रम यादव यांचे काम प्रशंसनीय आहे. कर्तव्यभावना जपत केल्या जाणाऱया आपल्या कामाला सहकार्य मिळावे हीच विक्रम यादव यांची अपेक्षा आहे.

या रक्ताची उपलब्धता तात्काळ व्हावी याकरता सांगली जिह्यातील काही तरुणांनी एकत्र येत ‘बॉम्बे रक्तगटा’ विषयी जनजागृती करत हा रक्तगट असणाऱया व्यक्तींची शोधमोहीम हाती घेतली आहे. ‘ओ. एच.एच. (बॉम्बे) रेअर ब्लड ग्रुप असोसिएशन’ या संस्थेद्वारे या रक्तगटाबाबत व्यापक प्रमाणात शोध व मदतकार्य सातत्याने चालू असते.

बॉम्बे रक्तगटासंदर्भात अधिकाधिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी  व त्यायोगे मदत मिळणे सोपे व्हावे याकरता या संस्थेच्या वतीने  www.bombay.org या  संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. कृष्णाकाठ सोशल फाऊंडेशन, भिलवडीचे अध्यक्ष अमोल वंडे, बॉम्बे ब्लड ग्रुप असणारे व मदतकार्यात तत्पर असणारे विक्रम यादव व इतर सहाकारी यांच्या पुढाकाराने हे मदतकार्य अव्याहत सुरू राहते. केवळ बॉम्बे ब्लड गुपच नव्हे तर इतर सर्व रक्तगटातील व्यक्तींना योग्य मदत पोहोचावी याकरताही वेगवेगळे व्हॉटस् ऍप ग्रुप व इतर संपर्क समूह या रक्तदात्यांद्वारे करण्यात आले आहेत. बॉम्बे रक्तगट असणाऱया व्यक्तीबाबत  ९९७०१८००१  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेद्वारे करण्यात येते.

बॉम्बे ब्लड ग्रुपबाबत जागरूकता

मानवी रक्तामध्ये  बॉम्बे रक्तगट दुर्मिळ मानला जातो. हा रक्तगट असलेल्या  व्यक्तींचे प्रमाण लाखात चार इतकेच आहे. या गटाचे रक्त ऐनवेळी उपलब्ध न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता बळावते. अशा रुग्णांच्या मदतीला धावून येणारा रक्तदाता विक्रम यादव. आतापर्यंत विक्रम यादवने अनेकांना जीवनदान दिले आहे. याचे कारण आहे ते म्हणजे त्यांचा दुर्मिळ असणारा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्तगट. आपल्यापैंकी बहुतेकांना ओ, बी, ए पॉझिटिव्ह व निगेटिव्ह ब्लड ग्रुप माहीत आहेत. परंतु आता यात दुर्मिळ अशा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ चाही समावेश झाला आहे.

रक्ताचे नाते’

‘नीड ब्लड कॉल अस’ हा ध्यास जपत गेली १७ वर्षे रक्तदानाद्वारे असंख्य रुग्णांचे प्राण वाचवणारी ट्रस्ट म्हणजे ‘रक्ताचे नाते’. या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना २००१ मध्ये करण्यात आली. परंतु त्याही आधीपासून कितीतरी वर्षे ट्रस्टचे संस्थापक राम बांगड यांनी असंख्य गरजूंना रक्त पुरवण्याचा ध्यास जपला आहे. शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये असणाऱया अनेक रुग्णालयातील रक्ताची गरज व रक्तदाते यांचा योग्य समन्वय ‘रक्ताचे नाते’ ट्रस्टद्वारे साधला जातो. या समन्वयातूनच विविध रक्तगटांच्या तब्बल सात हजार रक्तदात्यांचा शोध संस्थेद्वारे घेण्यात आला आहे. या रक्तदात्यांच्या रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान देण्याची सेवा ट्रस्टद्वारे केली जाते. रक्तदात्यांना एकत्र करत ही आगळी सेवा करणारे राम बांगड हे बँक कर्मचारी आहेत.

गरजूंना रक्त पुरवण्याच्या हेतूने रक्ताचे नाते या ट्रस्टची त्यांनी स्थापना केली. आतापर्यंत ५०० हून अधिक शस्त्रक्रियेच्या वेळी आवश्यक असणारी रक्ताची गरज ट्रस्टने पूर्ण केली आहे. हा ट्रस्ट सुरू करणारे प्रेरणास्रोत राम बांगड यांचा रक्तदानाचा प्रवास थक्क करणारा आहे.

१९७६ मध्ये पुण्यातील एका झोपडपट्टीतील भिंत एका मुलीच्या अंगावर कोसळली. तिला रक्ताची तात्काळ गरज होती. त्यावेळी रक्तदान करून राम बांगड यांनी तिचे प्राण वाचवले. राम बांगड यांच्या चळवळीला इथूनच सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच त्यांचे रक्तदानाचे काम ट्रस्टच्या माध्यमातून अखंड सुरू आहे.  राम बांगड यांच्या ‘रक्ताचे नाते’ या ट्रस्टकडे ४० हजार रक्तदात्यांची सूची आहे. त्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त निगेटिव्ह रक्तगट असलेले रक्तदाते आहेत. ट्रस्टद्वारे गरीबांना मोफत रक्त देण्याचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. ट्रस्टच्या हाकेला प्रतिसाद देऊन उत्स्फूर्त रक्तदान करणाऱया रक्तदात्यांनाच या सेवेचे श्रेय जाते, असे राम बांगड सांगतात.

रक्ताचे नाते ट्रस्टद्वारे दहा हजारांपेक्षा जास्त रक्ताच्या बॅग व दोन हजारांपेक्षा जास्त रक्तदाते तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यासाठी ट्रस्टकडे बारा हजार रक्तदात्यांची फौज आहे. याचबरोबर दरवर्षी ट्रस्टद्वारे रक्तदान शिबीर घेण्यात येते. या शिबिरातून किमान एक हजार बॅग रक्त गोळा केले जाते. याबरोबरच मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी रक्तदाते पाठवले जातात. प्लेटलेटस्ची गरज पूर्ण करण्यासाठी ट्रस्टकडे रक्तदात्याची वेगळी सूचीदेखील करण्यात आली आहे. दुर्मिळ रक्तगटासह सर्व रक्तगटांच्या रक्तदात्यांची सूची ट्रस्टकडे उपलब्ध आहे. हे रक्तदाते गरजेच्या वेळी केवळ सांगण्यावरून रक्तपेढीकडे रक्तदान करतात. राम बांगड यांच्या ‘रक्ताचे नाते’ ट्रस्टने ही विश्वासार्हता जपली आहे. या विश्वासार्हतेतूनच पुणे आजूबाजूच्या भागातील अनेक रुग्णालये व गरजूंना ‘रक्ताचे नाते’ ट्रस्टचा आधार वाटतो.

ट्रस्टचे सर्वेसर्वा राम बांगड यांची सेवाशील वृत्ती आणि त्यांनी जपलेले रक्तदानाचे क्रत यामुळेच ट्रस्टचे कार्य सुरळीत चालू आहे. रक्तदानाशिवाय राम बांगड व त्यांच्या ट्रस्टकडून गरीब रुग्णांना विविध प्रकारे मदत केली जाते. पुण्यातील ससून रुग्णालयामधील बाहेरगावाहून येणाऱया रुग्णांच्या नातेवाईकास गेली १० वर्षे एकवेळचे जेवण देणारी संस्था राम बांगड यांनी सुरू केली असून या संस्थेचे विश्वस्त म्हणून ते काम पाहतात. आतापर्यंत राम बांगड यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

रक्तदानाची सेवा हे क्रत म्हणूनच ट्रस्टद्वारे केले जाते. ट्रस्टचा ध्यास पाहूनच अनेक रक्तदाते निरपेक्ष भावनेने रक्तदान करतात. ट्रस्टच्या सान्निध्यातील अनेक रक्तदात्यांनी वर्षभरातून ४ वेळा रक्तदान करण्याचे क्रत हाती घेतले आहे. याबरोबरच रक्ताची वाढती गरज पाहता रक्तदात्यांची अद्ययावत सूची तयार करणे आणि रक्तदात्यांना संपर्कात ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य ट्रस्टद्वारे केले जाते.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या