महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीप; मेरी कोम, जमुना, लव्हलीना यांना कांस्य पदक

हिंदुस्थानच्या तीन बॉक्सर्सचे जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न शनिवारी भंग पावले. मेरी कोम, जमुना बोरो व लव्हलीना बोर्गोहेन या तीनही बॉक्सर्सना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे कास्य पदकावरच समाधान मानावे लागले. मंजू राणी हिने मात्र 48 किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश करीत सुवर्ण पदक पटकावण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

अपील फेटाळले अन् कास्य कायम राहिले
तुर्कीच्या बुसानाझ साकीरोगलू हिने मेरी कोमला 4-1 अशा फरकाने पराभूत करीत 51 किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केली. हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने या लढतीच्या पुनरावलोकनाची मागणी केली होती, पण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनकडून (आयबा) हे अपील फेटाळण्यात आले. मात्र तरीही मेरी कोमने आठव्या जागतिक पदकांसह इतिहास रचला. या स्पर्धेत आठ पदके जिंकणारी ती पहिलीच खेळाडू हे विशेष.

18 वर्षांत प्रथमच सहाव्या सीडेड मंजू राणी हिने थायलंडच्या चुथमत राकसात हिला 4-1 अशा फरकाने पराभूत करीत फायनलमध्ये प्रवेश केला. आता उद्या होणाऱया अंतिम फेरीच्या लढतीत तिच्यासमोर रशियाच्या एकतेरीना पाल्तसेवा हिचे आव्हान असणार आहे. जागतिक स्पर्धेतील पदार्पणातच फायनलमध्ये प्रवेश करणारी मंजू राणी ही गेल्या 18 वर्षांतील हिंदुस्थानची पहिलीच खेळाडू ठरलीय हे विशेष.

सलग दुसऱयांदा तिसरा क्रमांक
लव्हलीना बोर्गोहेन हिला 69 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत हार सहन करावी लागली. यामुळे पुन्हा एकदा तिला तिसरा क्रमांक मिळाला. हे तिचे या स्पर्धेतील सलग दुसरे कास्य पदक ठरले. चीनच्या यांग लुई हिने तिला 3-2 असे हरवले. चीन तैपईच्या हुआंग वेन हिने 54 किलो वजनी गटात जमुना बोरो हिला 5-0 असे नमवले.

आपली प्रतिक्रिया द्या