जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप; लव्हलीना, जमुना उपांत्यपूर्व फेरीत

255

हिंदुस्थानच्या महिला बॉक्सर्सची जागतिक महिला बॉक्सिंगमधील दमदार कामगिरी बुधवारीही सुरूच राहिली. लव्हलीना बोर्गोहेन हिने 69 किलो वजनी गटात आणि जमुना बोरो हिने 54 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारत पदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली. या मानाच्या स्पर्धेत हिंदुस्थानच्या पाच बॉक्सर्सनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. याआधी दिग्गज मेरी कोम, मंजू राणी व कविता या खेळाडूंनी आगेकूच केली आहे.

लव्हलीना बोर्गोहेनने मोरोक्कोच्या ओमायमा अहबिब हिला 5-0 अशा फरकाने सहज हरवले. या स्पर्धेत सलग दुसऱयांदा पदक जिंकण्यासाठी हिंदुस्थानी खेळाडू सज्ज झाली आहे. तिच्यासमोर आता पोलंडच्या कॅरोलिना कोसझेवस्का हिचे आव्हान असणार आहे. जमुना बोरो हिने पाचव्या सीडेड अल्जेरियाच्या क्युडॅड स्पोह हिला 5-0 अशा फरकाने धूळ चारली. आता तिला जर्मनीच्या उरसुला गॉटलॉब हिचा सामना करावयाचा आहे.

आजचा दिवस महत्त्वाचा

हिंदुस्थानी बॉक्सर्ससाठी गुरुवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. हिंदुस्थानच्या पाचही बॉक्सर्सच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती उद्या होणार आहेत. लव्हलीना बोर्गोहेन, जमुना बोरो या दोन खेळाडूंसह मेरी कोम, मंजू राणी व कविता यांच्याही लढती उद्या होणार आहेत. हिंदुस्थानला या स्पर्धेत किमान पदके किती मिळतील हे उद्याच समजेल. कारण उद्याच्या लढतीत पाचही खेळाडूंनी विजय मिळवल्यास हिंदुस्थानची पाच पदके निश्चित होतील. फक्त पदकाचा रंग कोणता असेल याचे उत्तर त्यानंतर मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या