वेदनादायी उपचारानंतर झाला नव्या आयुष्याचा ‘उगम’, कॅन्सरवर मात केलेल्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा

लहान वयातच कॅन्सरचे निदान झाले तेव्हा संपूर्ण कुटुंब कोलमडून गेले. शाळेतील मुलेही लांब जाऊ लागली. मग महागडय़ा व वेदनादायी उपचारांचे काळेकुट्ट पर्व सुरू झाले. पण या काळय़ाकुट्ट किनारीला एक दिवस सुवर्णकिनार लाभली. प्रदीर्घ उपचारानंतर डॉक्टरांनी या मुलांना कॅन्सरमुक्त जाहीर केले. अशी मुले-मुली आज समाजाच्या विविध क्षेत्रांत आपले नाव उज्ज्वल करून कॅन्सरवर उपचार घेणाऱयांना नवी प्रेरणा देत आहेत.

कॅन्सरला हरवून नव्याने आयुष्य जगणाऱया बालकांना सलाम करण्यासाठी ‘इंडियन कॅन्सर सोसायटी’ व ‘उगम’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने उद्या, रविवारी ‘चाईल्डहूड कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ साजरा होत आहे. यानिमित्त उद्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये पॅन्सरवर मात केलेले तरुण-तरुणी त्यांच्या प्रेरणादायी कथा सांगून सध्या उपचार घेणाऱयांना नवे बळ देणार आहेत.

कॅन्सरमुळे धीरोदात्त झाला

– अशीच काहीशी कथा आहे सूरज कन्वरची. वयाच्या नवव्या वर्षी त्याला कॅन्सरने गाठले. त्यामुळे तो खचला, पण डॉक्टर व कुटुंबाने आधार दिला. या आजारावरील उपचार सहनशिलतेची परीक्षा घेणाऱया असतात. उपचारांच्या काळात डोक्यावरचे केस गेले, वजनही कमी झाले. आयुष्यात फक्त नकारात्मकता आली. पण उपचाराला यश आले. आता सूरज सॉफ्टवेअर इंजिनीयर झाला आहे. सध्या पॅन्सरवर उपचार घेणाऱयांना सूरज हा ‘उगम’ संस्थेच्या माध्यमातून सकारात्मकतेचा संदेश देत आहे.

श्रेय डॉक्टरांनाच

– सुमित मखीजा याचा 2002 मध्ये वयाच्या दुसऱया वर्षी अचानक डावा हात दुखू लागला. अनेक चाचण्याअंती अखेरीला कॅन्सरचे निदान झाले. हा कुटुंबावर आघातच होता. लहानग्याला तर काहीच कळत नव्हते. पुढे अकरा महिने अहमदाबादमध्ये उपचार झाले, पण गुण येत नव्हता. अखेर मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये वेदनादायी किमोथेरेपीने उपचार सुरू झाले. तब्बल चार वर्षे प्रदीर्घ उपचार सुरू होते. अखेरीस 2007 मध्ये सुमितला कॅन्सरमुक्त घोषित केले. वेदनादायी जीवनातील हा त्याच्यासाठी सुवर्णक्षण होता. तो आता आयटी इंजिनीयर आहे. आता तो कॅन्सरवर उपचार घेणाऱया त्याच्यासारख्याच मुलांना प्रेरणा देत आहे.

परिस्थितीवर मात केली

– हेमंत परदेशीची कथाही यांच्याहून काही वेगळी नाही. 2005 मध्ये जेव्हा कॅन्सरचे निदान झाले तेव्हा त्याचे कुटुंब सुशिक्षित नव्हते. पण समजूतदार आणि परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. पण त्यांनी मुलावर टाटा मेमोरिअल रुग्णालयामध्ये उपचार सुरू केले. महागडे उपचार होते, पण ‘इंडियन कॅन्सर सोसायटी’ मदतीला धावून आली. या सोसायटीने केवळ वैद्यकीय उपचारांसाठी हेमंतला आर्थिक मदत केली नाही, तर इंजिनीयरिंगच्या शिक्षणासाठीही मदत केली.

प्रेरणादायी संघर्षाचे अनुभव

– कॅन्सरवर मात केलेल्या यांच्यासारखे अनेकजण आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 4 वाजता आयोजित कार्यक्रमात प्रेरणादायी संघर्ष कथन करणार आहेत.