ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये

सामना ऑनलाईन, लंडन

कर्णधार ऍरोन फिंचचे दमदार शतक… डेव्हिड वार्नरची आणखी एक अर्धशतकी खेळी… अन् जेसन बेहरेनडोर्फचे पाच व मिचेल स्टार्कच्या चार बळींच्या जोरावर गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाने मंगळवारी यजमान इंग्लंडचा 64 धावांनी धुव्वा उडवला आणि सहाव्या विजयासह वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली. 100 धावा तडकावणाऱ्या ऍरोन फिंचची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. या पराभवामुळे इंग्लंडचा सेमी फायनलचा प्रवास खडतर झाला आहे.

धावसंख्येला ब्रेक

ऍरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर जोडीने धडाकेबाज सुरुवात करून दिल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ सहज तीनशेच्यावर धावसंख्या उभारील असे वाटत होते; पण 1 बाद 173 या धावसंख्येवरून त्यांना 285 धावाच करता आल्या. ऍरोन फिंचने 116 चेंडूंत दोन षटकार व अकरा चौकारांसह 100 धावांची खेळी साकारली. उस्मान ख्वाजाने 23, स्टीवन स्मिथने 38 आणि ऍलेक्स कॅरीने नाबाद 38 धावा केल्या. ख्रिस वोक्सने इंग्लंडकडून सर्वाधिक दोन फलंदाज बाद केले.

पुन्हा शतकी सलामी

ऍरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर या ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी याही लढतीत आपला ठसा उमटवला. या स्पर्धेत या दोन फलंदाजांकडून सातत्याने धावांचा पाऊस पाडला जात आहे. पाकिस्तान व बांगलादेश या देशांविरुद्ध त्यांनी शतकी सलामी दिल्यानंतर या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दोघांनी 123 धावांची शानदार भागीदारी रचली. मोईन अलीने डेव्हिड वॉर्नरला 53 धावांवर बाद करीत जोडी फोडली.  कांगारूंकडून मिळालेल्या 286 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा डाव 221 धावांमध्येच गडगडला. बेन स्टोक्सने 89 धावांची खेळी करीत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण त्याला काही यश मिळाले नाही. मिचेल स्टार्कने 43 धावा देत चार आणि जेसन बेहरेनडोर्फने 44 धावा देत पाच फलंदाज बाद करीत यजमानांच्या डावाला खिंडार पाडले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया-फिंच झे. वोक्स. गो. आर्चर 100, वॉर्नर झे. रूट गो. अली 53, अवांतर-8. एकूण-285. गोलंदाजी-वोक्स 10-0-46-2,

इंग्लंड-स्टोक्स त्रि. गो. स्टार्क 89. अवांतर-9. एकूण-44.4 षटकांत सर्व बाद 221. गोलंदाजीः बेहरेनडोर्फ 10-0-44-5, स्टार्क 8.4-1-.43-4.