हिंदुस्थानचा गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला धक्का

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थानने रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्या विजयासह चार गुणांची कमाई केली. शिखर धवनचे 17वे वन डे शतक… रोहीत शर्मा व कर्णधार विराट कोहली यांची दमदार अर्धशतके… हार्दिक पांड्या व महेंद्रसिंह धोनी यांची झंझावाती फलंदाजी… अन् भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल यांनी निर्णायक क्षणी टिपलेल्या बळींच्या जोरावर टीम इंडियाने कांगारूंना 36 धावांनी पराभूत केले. बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या शिखर धवनची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

शिखर-रोहितची शतकी भागीदारी
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीचा कौल जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय शिखर धवन-रोहीत शर्मा या सलामीच्या जोडीने सार्थ ठरवला. या दोघांनी आधी सावध सुरुवात करून जम बसल्यावर 22.3 षटकांत 127 धावांची सलामी देत हिंदुस्थानला खणखणीत सुरुवात करून दिली. रोहितने 70 चेंडूंत 3 चौकार व एका षटकारासह 57 धावांची खेळी केली.

वॉर्नर, स्मिथ, कॅरीची अर्धशतके
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 353 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 316 धावांपर्यंत मजल मारता आली. डेव्हिड वॉर्नरने 56 धावांची, स्टीवन स्मिथची 69 धावांची, ऍलेक्स कॅरीने नाबाद 55 धावांची खेळी केली. पण त्यांना विजय मिळवून देता आला नाही. जसप्रीत बुमराहने 61 धावा देत तीन, भुवनेश्वरकुमारने 50 धावा देत तीन फलंदाज बाद केले. युजवेंद्र चहलने दोन फलंदाज बाद केले.

पांड्याची वादळी खेळी, पण…
तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या हार्दिक पांड्याने आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करताना 27 चेंडूंत 48 धावांची खेळी करताना 4 चौकारांसह 3 षटकारांचा घणाघात केला. मात्र अवघ्या दोन धावांनी हुकलेले त्याचे अर्धशतक चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. पॅट कमिन्सला भिरकवण्याच्या नादात पांड्याने फिंचकडे झेल दिला.

धवन-कोहली जोडी जमली
रोहीत बाद झाल्यानंतर शिखर धवन व आलेला विराट कोहली ही जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या गडय़ासाठी 93 धावांची भागीदारी केली. दरम्यान, शिखर धवनने कारकिर्दीतील सतरावे एकदिवसीय शतक पूर्ण केले. याचबरोबर आयसीसीच्या स्पर्धेत एकाच मैदानावर तीन शतके ठोकणारा तो क्रिकेटविश्वातील पहिला फलंदाज ठरला. धवनने 109 चेंडूंत 117 धावांची खेळी करताना 16 चेंडू सीमापार पाठवले. मिचेल स्टार्कने त्याला बदली खेळाडू नॅथन लायनकरवी झेलबाद करून कांगारूंना दुसरे यश मिळवून दिले.

धावफलक
हिंदुस्थान : रोहीत शर्मा झे. कॅरी गो. कुल्टर नाईल 57, शिखर धवन झे. बदली (नाथन लॉयन) गो. स्टार्क 117, विराट कोहली झे. कमिन्स गो. स्टोइनीस 82, हार्दिक पांड्या झे. फिंच गो. कमिन्स 48, महेंद्रसिंह धोनी झे.गो. स्टोइनीस 27, लोकेश राहुल नाबाद 11.
अवांतर : 10, एकूण : 5 बाद 352 धावा.
गोलंदाजी : पॅट कमिन्स 10-0-55-1, मिचेल स्टार्क 10-0-74-1, नाथन कुल्टर-नाईल 10-1-63-1, मार्कस स्टोयनीस 7-0-62-2
ऑस्ट्रेलिया : वॉर्नर झे. कुमार गो. चहल 56, स्मिथ पायचीत गो. कुमार 69, कॅरी नाबाद 55
अवांतर : 14, एकूण : सर्व बाद 316 धावा
गोलंदाजी : बुमराह 10-1-61-3, कुमार 10-0-50-3

आपली प्रतिक्रिया द्या