वर्ल्ड कप 2019 च्या सेमी फायनलमध्ये ‘या’ 4 संघांचे स्थान जवळपास निश्चित

सामना ऑनलाईन, लंडन

2019 च्या विश्वचषक स्पर्धेने अर्धा टप्पा पूर्ण केला असून आतापर्यंत दोन दिग्गज संघ हे स्पर्धेबाहेर फेकले जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. माजी विश्वकप विजेता पाकिस्तान आणि कागदावर मजबूत वाटणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे. बांग्लादेश आणि वेस्ट इंडीज या दोन संघांची सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड अजूनही सुरू आहे.

यंदाचा विश्वचषक वेगळ्या पद्धतीने खेळवण्यात येत आहे. यामध्ये सहभागी संघांचे दोन गट न पाडता सगळे संघ सगळ्या संघांबरोबर भिडणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ 9 सामने खेळणार आहे. या 9 सामन्यांनंतर जे संघ टॉप-4 मध्ये असतील ते सेमी फायनलमध्ये खेळतील.

सध्या न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थानचे संघ पहिल्या चार क्रमांकावर आहेत. हिंदुस्थानी संघाने पहिल्या तीन संघांपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. टीम इंडियाने पुढच्या एका सामन्यात विजय मिळवल्यास टॉप-4 संघांचा क्रम पूर्णपणे बदलणार आहे. इतर सगळे संघ 5 सामने खेळले आहे, मात्र हिंदुस्थानी संघ हा एकमेव संघ आहे ज्याने 4 सामने खेळले आहेत. हिंदुस्थानी संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरूद्ध झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवला असून एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. हिंदुस्थानी संघाला अजून 5 सामने खेळायचे असून यामध्ये टीम इंडियाचा मुकाबला अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज, इंग्लंड,बांग्लादेश, श्रीलंकेशी होणार आहे.

हिंदुस्थानी संघाच्या उरलेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडविरूद्धचा सामना हा सगळ्यात अवघड सामना मानला जात आहे. आतापर्यंतची संघाची कामगिरी पाहता टीम इंडिया सेमीफायनलमध्ये आरामात प्रवेश करू शकेल. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ देखील सेमी फायनलमध्ये पोहोचतील असं स्पष्ट चित्र तयार झालं आहे.