‘टीम इंडिया’ दहा दिवसांत खेळणार चार सामने

टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सराव केला

सामना ऑनलाईन, लंडन

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा शंखनाद झाल्यानंतर तब्बल आठवडाभराने ‘टीम इंडिया’ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेस प्रारंभ केला होता. त्यानंतरच्या प्रत्येक लढतीपूर्वीही हिंदुस्थानी संघाला भरपूर विश्रांती मिळालेली आहे. मात्र आता उर्वरित चार साखळी लढती दहा दिवसांत खेळायच्या असल्याने विराट सेनेचा खरा कस लागणार आहे.

विश्वचषक स्पर्धेत ‘टीम इंडिया’ने आतापर्यंत चार लढती खेळल्या असून न्यूझीलंडविरुद्धची एक लढत पावसात वाहून केली. 5 लढतींतील 9 गुणांसह हिंदुस्थानी संघ गुणतालिकेत सध्या तिसऱ्या स्थानी आहे. आता उर्वरित चार लढतींत विराट कोहलीची सेना 27 जूनला वेस्ट इंडीजविरुद्ध, 30 जूनला इंग्लंडविरुद्ध, 2 जुलैला बांगलादेशविरुद्ध, तर 6 जुलैला श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. इंग्लंडविरुद्धची लढत झाल्यानंतर केवळ एका दिवसात ताजेतवाने होऊन हिंदुस्थानला बांगलादेश संघाशी दोन हात करायचे आहेत. या दोन्ही सघांकडून हिंदुस्थानला कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिका यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून विंडीजही बाद झाल्यात जमा आहे. मात्र जर-तरच्या समीकरणात अजूनही इतर सात संघांना अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्याची संधी आहे.

नेट गोलंदाजीसाठी सैनीला पाचारण

‘टीम इंडिया’चा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जायबंदी झाल्यामुळे संघ व्यवस्थापनाने नव्या दमाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला इंग्लंडमध्ये पाचारण केले. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भुवनेश्वरच्या पायाचा स्नायू दुखावल्याने तो अनफिट झाला आहे. तो पुन्हा कधी फिट होणार याबाबत अद्यापि समजलेले नाही.