जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी अमेरिका, यूएई, जपानच्या केंद्रीय बँकांनी तिजोरी उघडली

1003

कोरोना व्हायरसमुळे मंदीच्या गर्तेत सापडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला वाचवण्याच्या लढाईत आता केंद्रीय बँका सरसावल्या आहेत. यामध्ये अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, चीन, जपान, या देशांच्या केंद्रीय बँकांचा समावेश आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह बँक (फेड)ने बेंचमार्क व्याजदर शून्य ते 0.25 टक्के इतका केला आहे. याआधी हा व्याजदर 1 ते 1.25 एवढा होता. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने व्याजदरात एक टक्का कपात केली आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह बँक (फेड)ने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत 700 अब्ज डॉलर्स टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये 500 अब्ज डॉलर आणि 200 अब्ज डॉलरच्या सरकारी बॉण्ड खरेदीचीही घोषणा केली आहे. न्यूझीलँडच्या केंद्रीय बँकांनी आपत्कालीन बैठक घेतल्यानंतर व्याजदरात 75 बेसिस पॉइंटच्या कपातीचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी रात्री अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने 1 ते 3 महिन्यांच्या कालावधीतील एक लाख कोटी डॉलरच्या रेपो ऑपरेशनची घोषणा केली. बँक ऑफ जपानने बॉण्ड खरेदीची घोषणा केली. चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने बँकांचे रिझर्व्ह रिक्वायरमेंट दर 0.5 टक्के कमी करून 1 टक्का केले.

यूएई केंद्रीय बँकेची 27 अब्ज डॉलरच्या निधीची घोषणा
संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) केंद्रीय बँकेने रविवारी अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी 27 अब्ज डॉलरच्या पॅकेजची घोषणा केली. याअंतर्गत यूएईच्या बँकांना मदत केली जाणार आहे. सौदी अरबनेही वेगळ्या 13 अब्ज डॉलरच्या दिलासा पॅकेजची घोषणा केली आहे.

आरबीआयची परिस्थितीवर नजर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी शुक्रवारी 1.5 अब्ज डॉलर विकल्याचे समजते. अद्याप आरबीआयने या माहितीला दुजोरा दिलेला नाही. मात्र आरबीआयने उचललेल्या पावलामुळे शुक्रवारी रुपया आशियातील सर्वाधिक उसळी मारलेले चलन बनले होते. आरबीआय सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे. दोन अब्ज डॉलर किमतीचे अमेरिकन डॉलर बँकांना पहिल्या टप्प्यात विकणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या