कोरोनामुळे 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; डब्लूएचओचा चिंताजनक इशारा

जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनावर संशोधन सुरू असणाऱ्या लसीच्या प्रभावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) साशंकता व्यक्त केली आहे. कोरोनावर येणाऱ्या लस प्रभावीपणे काम करतील, याची खात्री देता येत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. तसेच आता डब्लूएचओने चिंताजनक इशारा दिला आहे. कोरोनाची लस येऊन त्याचे वितरण होईपर्यंत जगभरात कोरोनाने 20 लाख लोकांचा मृत्यू होईल, अशी भीती डब्लूएचओने व्यक्त केली आहे. हे धक्कादायक आणि चिंताजनक असले तरी कोरोनाचा प्रकोप पाहता हा अंदाज वर्तवण्यात आल्याचे डब्लूएचओने स्पष्ट केले आहे.

कोरोना महामारीच्या जागतिक संकटाचा एकजूटीने मुकाबला केला नाही, तर ही संख्या आणखी वाढण्याचा इशाराही डब्लूएचओने दिला आहे. आतापर्यंत जगभरात 3 कोटी 27 लाख लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. अजूनही या संकटातून आपण बाहेर आलेलो नाही. तरुणांमुळे संक्रमण वाढत आहे, असे सांगत या पिढीला दोष देण्यात अर्थ नाही. कोरोना रोखण्यासाठीचे नियम सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. तसेच लस येईपर्यंत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. जगभरात होणाऱ्या पार्ट्यांमुळे संक्रमण वाढत आहे. त्यात सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.

कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप अमेरिकेत झाला असून अमेरिकेत 2 लाख 8 हजार, हिंदुस्थानात 93 हजार, ब्राझीलमध्ये एक लाख 40 हजार आणि रशियामध्ये 20 हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण झाले असून अमेरिकेत 72 लाख कोरोनाबाधित आहेत. तर हिंदुस्तानात 59 लाख कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत 9 महिन्यांमध्ये 9.93 लाख कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनावर प्रभावी लस येईपर्यंत 20 लाख कोरोनाबाधितांचा मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच हा अंदाज खरा होण्याची भीती असल्याचे डब्लूएचओचे आपत्कालीन कार्यक्रम प्रमुख माइक रेयान यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या