जागतिक हृदय दिवस, हिंदुजाच्या इमारतीवर धडधडणारे हृदय 

कार्डिओव्हॅस्क्युलर आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरतर्फे मंगळवारपासून 29 सप्टेंबरपर्यंत सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या वेळेत हॉस्पिटलच्या आयपीडी इमारतीवर होलोग्राफच्या माध्यमातून धडधडणाऱ्या हृदयाची प्रतिमा प्रदर्शित केली गेली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हृदयाचे आरोग्य अखंड जपण्याच्या महत्त्वाविषयी जनजागृतीस चालना देण्याचा रुग्णालयाचा हेतू आहे. याबरोबरच चालणे, पावलांची संख्या वाढविणे आणि अधिक निरोगी जीवनशैली स्वीकारणे या गोष्टींचा शुभारंभ करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी रुग्णालयातर्फे ‘हिंदुजा हॉस्पिटल हेल्थी हार्ट चॅलेंज’ ही 3 दिवसांची फिटनेस स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे.

कार्डिओव्हॅस्क्युलर आजार (सीव्‍हीडी) हे हिंदुस्थानातील मृत्यूमागच्या काही प्रमुख कारणांपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने असंसर्गजन्य आजार (non-communicable diseases – NCDs) विषयी जारी केलेल्या राष्ट्रवार आकडेवारीनुसार एकूण मृत्यूंपैकी जवळ-जवळ 53 टक्‍के मृत्यू हे एनसीडींमुळे होतात असा अंदाज आहे. यामध्ये सीव्‍हीडींचा वाटा सर्वात मोठा म्हणजे सुमारे 24 टक्‍के आहे. देशभरात घेतल्या गेलेल्या वैद्यकीय पाहण्यांनुसार चाळीशीच्या आतल्या जवळ-जवळ 25 टक्‍के हिंदुस्थानियांना हार्ट अटॅक येण्याचा धोका आहे तर इतरांना हृदयाशी संबंधित गुंतागुंतीचे आजार जडण्याची शक्यता आहे. 40 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या बाबतीत हा धोका 50 टक्क्यांनी वाढतो. या गोष्टीची नोंद घेत हृदयाच्या आरोग्याचे महत्त्व आणि नियमित व्यायाम, रक्तातील साखरेच्या पातळीवर देखरेख ठेवणे, रक्तदाब आणि 8 तासांची झोप यांसारख्या आरोग्यदायी सवयींचा आपल्या आयुष्यात अंतर्भाव करण्याचे महत्व अधोरेखित करणे हे पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसीचे उद्दीष्ट आहे.

या प्रसंगी बोलताना पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसीचे सीओओ जॉय चक्रबोर्ती म्हणाले, “हृदयाचे आरोग्य हा हिदुस्थानातील एक महत्त्वाचा विषय आहे. अलीकडच्या काळात, विशेषत: तरुण व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकची प्रकरणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका स्वस्थ आयुष्याची हमी मिळविण्यासाठी हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणे व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. हृदयविकाराच्या या वाढत्या प्रमाणाला कारणीभूत ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे कामाच्या लांबलचक वेळेमुळे वाढणारी ताणतणावांची पातळी, कमी झालेली झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव. आपल्या जगण्यामध्ये आरोग्यदायी सवयींचा अंतर्भाव करण्याबरोबरच लोकांनी नियमितपणे आरोग्य तपासण्या करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला हृदयविकाराचा आणि अन्य गंभीर गुंतागुंतीचा धोका किती संभवतो हे त्यांना निश्चितपणे समजू शकेल. हा उपक्रमाच्या माध्यमातून हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देण्याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आमचा हेतू.”