पालिका डॉक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचले महिलेचे प्राण

पालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱयाच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचे प्राण वाचले आहेत. घाटकोपर मेट्रो स्टेशनवर ही महिला बेशुद्ध होऊन पडली असता या ठिकाणी पालिकेच्या सहार आरोग्य केंद्रातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी गायकवाड यांनी प्राथमिक तपासणी करून छातीवर दाब देऊन (सीपीआर मेथड) महिलेला शुद्धीवर आणले. यानंतर त्या महिलेवर आवश्यक उपचार करण्यात आले.

घाटकोपर मेट्रो स्थानकावर एक 23 वर्षीय महिला अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली. त्याचवेळी योगायोगाने तेथून जात असलेल्या डॉ. गायकवाड यांनी महिलेची तपासणी करत परस्थितीचे गांभीर्य ओळखत छातीवर दोनवेळा सीपीआर दिल्याने सदर रुग्ण महिला काही प्रमाणात शुद्धीवर आली. याप्रसंगी त्या ठिकाणी असणाऱया डॉ. प्राही नायक आणि डॉ. चंद्रकांता यांनीदेखील याकामी मोलाची मदत केली. यानंतर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पुढील वैद्यकीय उपचार करण्यात आले. दरम्यान, 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिनानिमित्त आपल्या हृदयाबद्दल आणि एकूणच आरोग्याबद्दल आपण जागृत असणे गरजेचे आहे. तसेच ज्यांना मधुमेह किंवा रक्तदाब आहे त्यांनी योग्य संतुलित आहार, पुरेशी झोप, व्यायाम करावा असे आवाहन पालिकेने केले आहे.