भुईला भार!

65

>>दिलीप जोशी<<

[email protected]

आज जागतिक लोकसंख्या दिवस आहे. जगाची लोकसंख्या मोजण्याची यंत्रणा रोजचा हिशेब ठेवत असते. किती नवी माणसं जन्मली आणि किती निजधामाला गेली याची गोळाबेरीज करून प्रत्येक क्षणाची लोकसंख्या सांगणारं ‘घडय़ाळ’ असतं. त्यानुसार २४ एप्रिल  २०१७ रोजी दुपारी साडेचार वाजता जगाची मानवी गणना ७ अब्ज ५० कोटी एवढी होती. आजची आपल्या देशाची लोकसंख्या १ अब्ज ३१ कोटी ८३ लाख १० हजार एवढी आहे. सन २१०० मध्ये आपण ११ अब्ज २० कोटी माणसं या भूगोलावर असणार आहोत. गेल्या दोन शतकांत माणसांची संख्या अपरिमित वाढली आहे. सन १३५० च्या सुमारास संपूर्ण जगाची जनसंख्या अवघी ३७ कोटी होती.

भूकंप, चक्रीवादळं, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि युद्ध तसंच साथीचे रोग यामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत प्रचंड होती. एखादी पिढीच युद्धात किंवा दुष्काळात नष्ट होत असे. त्या काळात जगाची लोकसंख्या मर्यादित  ठेवणाऱ्या या घटना माणसाच्या प्रगतीबरोबर कमी होत गेल्या. महायुद्धांनी विसाव्या शतकातही युरोपच्या लोकसंख्येवर नकारात्मक परिणाम केला होता, परंतु त्याच सुमाराला आधुनिक वैद्यकशास्त्रीाची वेगाने प्रगती होत गेली. विषाणुनाशक (ऍन्टीबायॉटिक) औषधाचा शोध लागला आणि अनेक आजार आटोक्यात आले. साहजिकच माणसांचा नैसर्गिक मृत्युदर मंदावला. जन्मदर मात्र त्या तुलनेत कमी झाला नाही आणि लोकसंख्या कमालीची वाढली.

आता पृथ्वी नावाच्या विशाल आणि निसर्गसंपन्न ग्रहावर विविध प्रजातींचे अब्जावधी जीव राहतात. एकपेशीय जिवापासून ते ब्लू व्हेलसारख्या अगडबंब जलचरापर्यंत जीवसृष्टीत लाखो सजीव प्रजाती आहेत. सजीव झाडं-झुडपं वेगळीच. या सर्वांचा हिशेब मांडला तर सरासरी साडेपाच-सहा फूट उंचीची दोन पायांवर चालणारी साडेसात अब्ज माणसं म्हणजे भुईला भार व्हायचं काही कारण नाही, परंतु माणसाच्या जीवनशैलीने साऱ्या सृष्टीला वेठीला धरलं आहे असं दिसतं. जगातील सर्वाधिक माणसं चीन आणि हिंदुस्थान या दोन देशांत राहतात. २०३० पर्यंतच्या लोकसंख्येचा अंदाज बघितला तर चीनची लोकसंख्या एक अब्ज चाळीस कोटींवर जाईल आणि हिंदुस्थानची लोकसंख्या कदाचित त्यापेक्षाही जास्त असेल! या काळात अमेरिका (यूएस) पस्तीस कोटी तर रशिया १४ कोटींच्या आसपास असेल. पाकिस्तान मात्र २४ कोटी आणि बांगलादेश १८ कोटींवर पोहोचेल.

आशियामधले आपण सवं मिळून ४ अब्ज ३० कोटी लोक म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या ६० टक्के असणार. चीन आणि हिंदुस्थानची एकत्रित लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या ३७ टक्के भरते. आफ्रिकेत १५ टक्के तर संबंध युरोपात मिळून जागतिक लोकसंख्येच्या १२ टक्केच माणसं राहतात. आशियातलं सर्वाधिक दाट लोकसंख्येचं शहर मात्र जपानमध्ये आहे. जपानची राजधानी असलेल्या टोकयोने लोकसंख्येचा कहर गाठला आहे. आफ्रिकेत लॅगोस, युरोपात मॉस्को, उत्तर अमेरिकेत मेक्सिको, दक्षिण अमेरिकेत साद्रो पावलो तर ऑस्ट्रेलियात सिडनी येथे जास्त लोकसंख्या आहे.

जगाची लोकसंख्या मोजण्याचे प्रयत्न सतराव्या शतकात सुरू झाले. १६८२ मध्ये विल्यम पेट्टी यांनी जगाची लोकसंख्या मोजली. ती (अवघी) ३२ कोटी भरली. आधुनिक अंदाजानुसार ती ६४ कोटी होती. १८ व्या शतकाच्या अखेरीस पृथ्वीवरची मनुष्यवस्ती १ अब्जावर पोहोचली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भूगोलावरच्या विविध खंडांची लोकसंख्या वेगवेगळी मोजली गेली. साधारण १२ ते १५ हजार वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात झाली तेव्हा साऱ्या जगात केवळ एक ते दीड कोटीच माणसे होती. (आता मुंबईची लोकसंख्या तेवढी आहे!) इसवी सनाच्या ७० हजार वर्षांपूर्वी म्हणजे आजपासून ७२ हजार १७ वर्षांआधी जगाची लोकसंख्या अचानक १० हजारांपर्यंत घसरली होती. चौथ्या शतकातील रोमन साम्राज्याचा सुवर्णकाळ आला तेव्हा तेथे ५ कोटी लोक राहात होते.

चीनमधील दुसऱ्या शतकातील हॅन राजवटीपासून लोकसंख्येची नोंद ठेवणं सुरू झालं. त्या काळात चीनची लोकसंख्या ५ कोटी होती. १६४४ पर्यंत ती १५ कोटी झाली. हिंदुस्थानात इसवीसपूर्व तीनशे वर्षांच्या काळात १० ते १४ कोटी लोक राहात होते आणि सन १६०० पर्यंत त्यात फारसा फरक पडला नव्हता. असं म्हणतात की, १६४७ च्या सुमारास सबंध हिंदुस्थानची लोकसंख्या १२ कोटी होती ती १९४७ पर्यंत ४० कोटींवर पोहोचली आणि त्यानंतरच्या काळात पाकिस्तान, बांगलादेश वगळता एकटय़ा हिंदुस्थानची लोकसंख्या सवाशे कोटींवर गेली आहे. वाढत्या लोकसंख्येकडे एक शक्ती म्हणून पाहा असं काहीचं मत आहे. ६५ टक्के तरुणवर्ग असलेल्या आपल्या देशातील मानवी ऊर्जा प्रचंड आहे. तुलनेने ‘म्हातारे’ असलेले युरोप-अमेरिकेतील देश उद्या आणखी वृद्ध होतील. आपल्याकडच्या प्रचंड लोकसंख्येचा भुईला भार न होता आधार कसा होईल याकडे सरकार आणि सामाजिक संस्थांनी लक्ष द्यायला हवं.

आपली प्रतिक्रिया द्या