समाजसेवेसाठी विश्वविक्रम ….मुकुंद गावडे

27

<< सामना स्टार>>    << नवनाथ दांडेकर >>

आतापर्यंत आपण प्रत्यक्ष क्रीडांगणावर पराक्रम साकारून राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल करणाऱया क्रीडापटूंची माहिती घेतलीय. आजच्या स्तंभात आपण घेणार आहोत सामाजिक जाणिवेने दुर्बल घटकांच्या मदतीसाठी चक्क विश्वविक्रमी कामगिरी साकारणाऱया हौशी क्रिकेटपटू मुकुंद सुभाष गावडे या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा आढावा. बालमित्रांनो मुंबईतल्या काळाचौकी भागात राहणारा मुकुंद बालपणापासून ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा चाहता. सचिनच्या शंभर क्रिकेट शतकांना आगळय़ावेगळय़ा पद्धतीने सलामी देण्याचे स्वप्न मुकुंद गेली अनेक वर्षे पाहत आला होता. त्यातच सेंट जॉर्ज महाविद्यालयात शिकताना त्याचा पालघर जिल्हय़ातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कार्य करणाऱया ‘समन्वय’ या एनजीओशी त्याचा संबंध आला. आदिवासी मुलांची भीषण अवस्था पाहून मुकुंद सतत अस्वस्थ असायचा. त्यातूनच क्रिकेटचे आपले कौशल्य या मुलांच्या मदतीसाठी वापरता येईल का? या विचारमंथनातून कीर्ती आणि पोदार महाविद्यालयातील त्याच्या मित्रांनी सलग १०० तास फलंदाजीचा विश्वविक्रम साकारण्याच्या त्याच्या कल्पनेवर मूर्त स्वरूप द्यायचे ठरवले. या प्रवासातच मुकुंदने सलग तीन दिवस जागे राहून ७२ तास २९  मिनिटे व २९ सेकंद हा फलंदाजीचा विश्वविक्रम मोठय़ा जिद्दीने साकारला. त्याच्या या विक्रमातून मिळालेला निधी त्याने पालघर जिल्हय़ातील पेणंद गावच्या १०० आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अर्पण केला आहे. त्याच्या या विक्रमातून सचिनच्या शंभर शतकांना सलामी आणि दुर्बल आदिवासी विद्यार्थ्यांना मदत असा दुहेरी हेतू मुकुंदने साध्य केलाय. मुकुंद सद्या क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करतोय आणि बॉलिवूड व टीव्ही मालिकांचा सेट डिझायनर म्हणून व्यवसाय करतोय.

मुकुंदच्या जिगरीला सर्वांची साथ

मुंबईच्या सेंट जॉर्ज विद्यालयात शिकणारा मुकुंद पुण्याच्या स्थानिक क्लबकडून क्रिकेट खेळतो. त्याचे वडील सुभाष गावडे निवृत्त असून आई रुग्णालयात काम करते. घरची जबाबदारी मुकुंदच्याच खांद्यावर असूनही समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजासाठी काहीतरी करायचेच या भावनेतून मुकुंदने सलग ७२ तासांहून अधिक काळ फलंदाजीचा विश्वविक्रम मोठय़ा जिगरीने साकारलाय. त्याच्या या विक्रमी उपक्रमाचे साक्षीदार दादरचे ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदान आहे. त्याच्या सेवाभावी विश्वविक्रमासाठी बंगाल क्लब, ससा स्पोर्टस, कीर्ती आणि पोदार महाविद्यालयातील मुकुंदचे मित्र, समन्वय संस्था, कीर्ति संजीवनी ट्रस्ट आणि स्थानिक नगरसेवकांचेही उत्स्फूर्त सहकार्य लाभले. मुकुंदने ७२ तासांहून अधिक वेळ सलग फलंदाजीचा विश्वविक्रम नोंदवताना सलग न चुकता १३ हजार चेंडू खेळण्याचा आणि पुणेकर विश्वविक्रमवीर विराज माटे याचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केलाय. बालमित्रांनो आपल्या या सेवाभावी विश्वविक्रमी मुकुंद दादाला उज्ज्वल यश लाभो, अशा शुभेच्छा आपण देऊ या.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या