सराव आमचा सुरू…कसोटी अजिंक्यपदासाठी दोन्ही संघांचा घासून सराव

जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्लूटीसी) स्पर्धेचा अंतिम सामन्याला अवघे पाच दिवस शिल्लक राहिलेले असताना हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांतील सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. कसोटी अजिंक्यपदावर नाव करण्यासाठी दोन्ही संघ कसूनच नव्हे, तर घासून सराव करताना दिसताहेत. 7 जूनपासून अजिंक्यपदासाठी दोघांचे युद्ध सुरू होईलच, पण आता जोरदार सराव सुरू आहे.

ओव्हलच्या मैदानावर हा ऐतिहासिक सामना खेळला जाणार असून ही खेळपट्टी ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांप्रमाणेच असल्याने ऑस्ट्रेलियाला अधिक फायदा मिळेल, असा अंदाज क्रिकेटतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हा अंतिम सामना कुकाबुरा चेंडूवर नाही, तर डय़ूक चेंडूवर खेळवला जाणार असल्याने हा बदल ऑस्ट्रेलियन संघासाठी डोकेदुखी ठरेल, असेही बोलले जात आहे.

आयपीएलची धामधूम संपताच आता अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे डब्लूटीसीच्या अंतिम सामन्याकडे. लंडन येथील ओव्हल क्रिकेट मैदानावर होणाऱ्या या सामन्यात गोलंदाजांचे पारडे जड राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वेगावान गोलंदाजांना डय़ूकचा हात

डय़ूक चेंडू हा वेगवान गोलंदाजांना साथ देणारा असल्याने अंतिम सामन्यात वेगवान गोलंदाजांचा बोलबाला असेल यात शंका नाही. 50 ते 55 षटकांपर्यंत डय़ूक चेंडू हा कोणत्याही दिशेला अगदी सहज वळू शकत असल्याने तो फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना डय़ूक चेंडूवर होणार असल्याने वेगवान गोलंदाज जास्त वेळ गोलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे.

पाऊस पडला तर राखीव दिवस

अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाची 56 टक्के शक्यता आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी पाऊस पडला तर पावसामुळे एक किंवा दोन तासांचा खेळ वाया गेल्यास पंच त्याच दिवशी त्याची भरपाई करू शकतात. तसेच सामन्याच्या कोणत्याही दिवशी पाऊस पडल्यास, पंचांकडे अतिरिक्त दिवस असेल. तो सामना राखीव दिवसापर्यंत जाऊ शकतो.

जडेजाअश्विन खेळणार

हिंदुस्थानचे मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर सध्या उत्तम गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे या डय़ूक चेंडूची त्यांना चांगली मदत मिळण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन या दोन्ही अनुभवी फिरकीपटूंना आपल्या गोलंदाजीची धार दाखवण्याची संधी मिळू शकते.

चेंडूतील बदल दोन्ही संघासाठी घातक

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा कुकाबूराऐवजी डय़ूक चेंडूवर खेळवला जाणार आहे. कुकाबूरा चेंडूची शिवण ही यंत्रावर केली जाते. त्यामुळे ही शिवण सपाट असते. मात्र, डय़ूक चेंडूची शिवण ही हातावरची असल्याने चेंडूची सीम थोडी वेगळी राहते. त्यामुळे गोलंदाजांना डय़ूक चेंडूवर पकड मिळवणे सोपे जाते.