वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप – टीम इंडिया न्यूझीलंडसोबत भिडणार, पहा कोण आहे मजबूत दावेदार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन टीम आमने-सामने असतील. साउथॅम्पटन येथे हा सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया कसोटीतील पहिल्या क्रमांकाची टीम आहे. तर दुसरीकडे आणि केन विलियमसनची न्यूझीलंड टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या दोन टीम मध्ये होणारी फायन रंगतदार ठरणार आहे.

कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडिया न्यूट्रल वेन्यूवर कसोटी सामना खेळणार आहे. तर न्यूझीलंडची टीम मात्र सहा वेळा न्यूट्रल वेन्यूवर कसोटी सामने खेळली आहे. न्यूझीलंडच्या टीमने सर्व सामने पाकिस्तानच्या विरुद्ध संयुक्त अरब अमीरात ( UAE ) मध्ये खेळले होते. श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या हल्ल्यांनंतर कोणतीही टीम पाकिस्तानात जाण्यास तयार नव्हती, ज्यामुळे पाकिस्तानच्या टीमचे सर्व सामने हे UAE मध्ये खेळवण्यात येत होते. या सहा सामन्यांपैकी तीन सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता. तर दोन सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. एक सामना ड्रॉ झाला होता.

टीम इंडियाने साउथॅम्पटनमध्ये 2 कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंडच्या टीम विरुद्ध खेळताना टीम इंडियाचा दोन्ही कसोटीत पराभव झाला होता. 2014 च्या दौऱ्यावेळी टीम इंडियाला इंग्लंडने 266 धावांनी पराभूत केले होते. तर 2018 मध्ये टीम इंडियाला 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियासाठी जमचे बाजू ही आहे की त्यांनी या ठिकाणी दोन कसोटी सामने खेळले आहेत. मात्र न्यूझीलंडने इथे अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही. या मैदानावर आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये तीन सामन्यांचा निर्णय लागला, तर तीन सामने अनिर्णित राहीले.

टीम इंडियाने इंग्लंडच्या भूमीवर आतापर्यंत 62 कसोटी सामने इंग्लंडच्या टीम विरोधात खेळले आहेत. त्यात टीम इंडियाने अवघे 7 सामने जिंकले आहेत, तर 34 कसोटीत पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच 21 सामने अनिर्णित राहिले आहेत. न्यूझीलंडचा रेकॉर्ड देखील चांगला नाही. न्यूझीलंडने इंग्लंडमध्ये इंग्लंडच्याच टीम विरुद्ध 54 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात केवळ 5 सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला आहे. 30 कसोटीत परभाव पत्करावा लागला तर 19 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांचा विचार केला तर आतापर्यंत दोन्ही टीममध्ये 59 कसोटी सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाला 21 आणि न्यूझीलंडला 12 विजय मिळाले आहेत. तर 26 कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत. गेल्या दोन कसोटीत न्यूझीलंडने टीम इंडियाला हिंदुस्थानात पराभूत केले आहे. मात्र असे असले तरी आकडे टीम इंडिया मजबूत असल्याचे दर्शवतात.


आपली प्रतिक्रिया द्या