हिंदुस्थानची अव्वल स्थानावर झेप, कांगारूंची तिसऱ्या स्थानावर घसरगुंडी

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने मंगळवारी ब्रिस्बेन कसोटीत देदीप्यमान विजय साकारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या ताजा गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. या दारुण पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. हिंदुस्थानचा संघ 71.7 पर्सेंटेज पॉइंटस्सह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. आता हिंदुस्थानचा संघ 5 फेब्रुवारीपासून इंग्लंडशी दोन हात करणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेशी भिडायचे आहे.

टीम इंडियाचे फायनलचे तिकीट पक्के

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना या वर्षी जून महिन्यात लॉर्डस् येथे होणार आहे. मार्च महिन्यापर्यंतच्या लढतीच्या निकषावर अंतिम फेरीतील दोन संघ निश्चित होणार आहेत. सध्याच्या गुणांनुसार टीम इंडियाचे अंतिम फेरीतील स्थान पक्के आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने किंवा 3-1 अशा फरकाने जिंकल्यास गुणतालिकेत हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंडच्या वर राहू शकतो.

…तर आयसीसीच्या रँकिंगमध्येही पहिले स्थान

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर घेतली आहे. टीम इंडियाचा संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थानावर पोहचू शकतो. सध्या 118 रेटिंगसह हा संघ न्यूझीलंडच्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर आहे. आगामी मालिकेत हिंदुस्थानी संघाने इंग्लंडला 2-0, 1-0, 2-1 असे पराभूत केल्यास आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही हा संघ पहिल्या स्थानावर पोहचू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या