दीपक पुनियालाही ऑलिम्पिकचे तिकीट

339

युवा मल्ल दीपक पुनियाने कझाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देत हिंदुस्थानला टोकियो ऑलिम्पिकसाठी कुस्तीतील चौथा कोटा मिळवून दिला, मात्र दुसरीकडे बिगर ऑलिम्पिक गटात मराठमोळा मल्ल राहुल आवारेला उपांत्य फेरीतच हार पत्करावी लागली. तो आता रविवारी कास्यपदकासाठी झुंजणार आहे.

दीपक पुनियाने शनिवारी 86 किलो गटाच्या उपांत्य लढतीत स्वित्झर्लंडच्या स्टीफन रिचमुथचा 8-2 गुणफरकाने सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. याचबरोबर त्याने 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचा कोटाही देशाला मिळवून दिला. दीपकने चूरशीच्या या उपांत्यपूर्व लढतीत कोलंबियाच्या कार्लोस मेंडेजवर 7-6 असा एका गुणांनी विजय मिळवला होता. दीपकच्या आधी विनेश फोगाट, बजरंग पुनिया व रवीकुमार दहिया यांनी आपापल्या वजनी गटात ऑलिम्पिकचा कोटा मिळविला आहे.

राहुल आवारे उपांत्य फेरीत पराभूत

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या राहुल आवारेला जागतिक कुस्ती स्पर्धेत 61 किलो गटाच्या उपांत्य लढतीत हार पत्करावी लागली. जॉर्जियाच्या बेका लोमाटड्जे याने त्याला 10-6 असे हरवले. बेकाने पहिल्या फेरीतच 7-1 अशी मुसंडी मारून राहुलवर दबाव आणला. दुसऱ्या फेरीत आधी 1 आणि नंतर 4 गुणांची कमाई करीत गुणांचे अंतर 6-8 असे कमी केले, मात्र बेकाने विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. राहुल आवारेने उपांत्यपूर्व लढतीत कझाकिस्तानच्या रासूल कालिएवचा 10-7 असा पाडाव केला होता.

दीपकला सुशीलकुमारची बरोबरी करण्याची संधी

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱया दीपक पुनियाला सुशीलकुमारची बरोबरी करण्याची संधी असेल. सुवर्णपदकाच्या लढतीत त्याची गाठ इराणच्या हसन याजदानिचाराटी याच्याशी पडणार आहे. जर दीपकने इराणच्या मल्लाला हरवले तर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा हिंदुस्थानी कुस्तीपटू ठरेल. दोन वेळच्या ऑलिम्पिकपदक विजेत्या सुशीलकुमारने 2010 मध्ये मॉस्कोतील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या