जागतिक स्पर्धा ऑलिम्पिकपेक्षा आव्हानात्मक ,स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाचे स्पष्ट मत

474

कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक आता पुढे ढकलण्यात आले आहे. पुढल्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी कुस्तीपटू तीन ते चार पदके जिंकू शकतील. कारण हिंदुस्थानच्या कुस्तीपटूंनी जागतिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली असून ही स्पर्धा ऑलिम्पिकपेक्षा आव्हानात्मक असते असे स्पष्ट मत हिंदुस्थानचा स्टार व अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने व्यक्त केले.

65 किलो वजनी  गटात चुरस

बजरंग पुनिया 65 किलो वजनी गटात देशाचे प्रतिनिधित्व करतो. बजरंग पुनियाने 2018 सालातील जागतिक स्पर्धेत याच वजनी गटातून खेळताना रौप्य, तर 2019 सालातील जागतिक स्पर्धेत याच वजनी गटातून खेळताना कास्य पदकावर मोहर उमटवली. या वजनी गटाबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, 65 वजनी गट हा जगातील आव्हानात्मक वजनी गट म्हणून ओळखला जातो. जगातील अव्वल कुस्तीपटू याच वजनी गटात सहभागी होतात. या गटात कमालीची चुरस पाहायला मिळते. त्यामुळे या वजनी गटातून खेळताना सलग दोनवेळा जागतिक किंवा ऑलिम्पिक चॅम्पियन होता येत नाही, असे बजरंग पुनिया यावेळी म्हणाला.

 या कुस्तीपटूंकडून आशा

2019 सालामध्ये कझाकस्तान येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानच्या कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली. बजरंग पुनियासह दीपक पुनिया (रौप्य, 86 किलो), विनेश फोगाट (कांस्य, 53 किलो), रविकुमार दहिया (कास्य, 57 किलो) यांनीही पदके जिंकून टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. या कुस्तीपटूंकडून ऑलिम्पिकमध्ये पदके पटकावण्याची आशा तमाम क्रीडाप्रेमींना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या