चिमुरडी देणार योगाचे धडे, दीपा गिरीची योग ऑलिम्पियाडसाठी निवड

21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचा सर्वत्र जोरदार सराव सुरू आहे.  जागतिक योग दिनी नवी दिल्लीत योग ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. यामध्ये उत्तराखंड येथील दीपा गिरी या 11 वर्षीय मुलीची निवड झाली आहे. दीपाचे वडील नैनिताल येथील महाधिवक्ता कार्यालयात माळी म्हणून काम करतात. एवढय़ा लहान वयात योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे मन जिंकण्यासाठी दीपा सज्ज झाली आहे. याबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दीपा गिरी ही तल्लीतालच्या कृष्णपूर भागात राहते. ती अटल उत्कृष्ट जीजीआयसी शाळेत इयत्ता सहावीत शिकत आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून ती योगाभ्यास करत आहे. दीपाने जीजीआयसी  धौलाखेडा हल्दवानी येथे एनसीईआरटीद्वारे आयोजित राज्यस्तरीय योग ऑलिम्पियाड भाग घेतला आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडमध्ये स्थान मिळवले. योग क्षेत्रात करीअर करण्याच्या भावना तिने व्यक्त केल्या.

दीपाचे वडील माळी आहेत तर आई कमला गिरी गृहिणी आहेत. अटल उत्कृष्ट जीजीआयसीच्या प्राचार्या सावित्री दुगतल यांनी सांगितले की, दीपा तिची ट्रेनर कांचन रावत यांच्यासमवेत दिल्लीला रवाना झाली आहे. ट्रेनर कांचन रावत यांच्यासोबत योग करणार आहे.