जगातलं सर्वात मोठं ‘नीलम रत्न’ सापडलं, मौल्यवान दगडाची किंमत 750 कोटी!

श्रीलंकेत एका अधिकाऱ्याच्या घराभोवती विहिरीचे खोदकाम सुरू असताना ‘नीलम रत्ना’चा अनमोल दगड सापडला आहे. जगातील हे सर्वात मोठे नीलम रत्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. तज्ञांच्या मते, या दगडाची किंमत सुमारे 750 कोटी रुपये एवढी आहे. नीलमच्या दगडाला सेरेंडिपीटी सैफायर असे नाव देण्यात आले आहे. हे रत्न सुमारे 510 किलो वजनाचे आणि 25 लाख कॅरेटचे आहे.

डॉ. गामागे यांनी अंगण परिसरात सापडलेल्या या रत्नाची माहिती प्रशासनाला दिली आहे. डॉ. गामागे रत्नांचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीने खोदकामादरम्यान जमिनीखाली काही अमूल्य रत्न दबल्याची माहिती दिली होती. हा मौल्यवान दगड स्वच्छ करण्यासाठी आणि त्यावरील मळ हटवण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल. त्यानंतर याचे परीक्षण करून नोंद होणार आहे. डॉ. गामागे यांनी सांगितले की, सफाईदरम्यान दगडामधून नीलमचे काही तुकडे तुटून पडले होते. त्याची तपासणी केली असता, तो उच्च श्रेणीतील मौल्यवान दगड असल्याचे दिसून आले. श्रीलंकेतील रतनपुरा शहर हे जेम सिटी म्हणून ओळखले जाते. तिथे याआधीही अनेक मौल्यवान दगड सापडलेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या