शास्त्रज्ञांनी शोधली आणखी एक ‘पृथ्वी’, जीवसृष्टी असण्याची शक्यता

2669

पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही? याचा शोध बऱ्याच काळापासून शास्त्रज्ञ घेत आहेत. पहिल्यांदाच शास्त्रज्ञांनी एका अशा ग्रहाचा शोध लावला आहे. जिथे मुबलक प्रमाणात पाणी असू शकते. जर पाणी असेल तर जीवसृष्टी असण्याचीही शक्यता आहे. याबाबत वैज्ञानिक म्हणाले आहेत की, आपल्या सौर मंडळाच्या बाहेर असलेल्या या ग्रहाच्या वातावरणात पाणी आहे आणि ते पृथ्वीसारखेच आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 100 प्रकाश वर्षे लांब असून सूर्याप्रमाणेच असलेल्या एक ताऱ्याभोवती हा ग्रह फिरत आहे. पृथ्वीच्या तुलनेत या ग्रहाचे वजन आठपट अधिक असू शकते.

आतापर्यंत ज्या ग्रहांचा शोध लावण्यात आला आहे, त्यामध्ये अनेक असे ग्रह आहे ज्यावर घातक गॅस असून तिथे जीवसृष्टी असणे शक्य नाही. काही ग्रह खडकांनी बनले असून त्यांना वायू मंडळ नाही. एखादा ग्रह जरी पृथ्वीसारखा सापडला तरी ताऱ्यापासून त्याचे अंतर इतके आहे की, एकतर पाणी बाष्पाच्या स्वरूपात किंवा बर्फाच्या स्वरूपात असू शकते. मात्र ‘K2-18b‘ नामक या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. हा ग्रह आपल्या ताऱ्यापासून फारसा लांब नाही किंवा बुधसारखा अगदी जवळही नाही. नॅचरल अॅस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या ग्रहावर पाणी असू शकते.

आतापर्यंत सापडलेल्या 4000 ग्रहांपैकी हा पहिला ग्रह आहे, ज्याचा पृष्ठभाग ठोस असून ज्याच्या वायू मंडळात पाणी असण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती देताना लंडन विद्यापीठातील शास्त्रज्ञ जिओवांना टिनेटी म्हणाले की, ‘आपल्या सौर मंडळाच्या बाहेरचा हा एक असा ग्रह आहे की ज्यामध्ये राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. ते पुढे म्हणाले की, या ग्रहावर समुद्र आहे की नाही? हे आता सांगता येणार नाही. मात्र समुद्र असण्याची शक्यता आहे.’

याच संशोधन कार्यातील मुख्य अभ्यासक म्हणाले की, ‘हा ग्रह पृथ्वीपासून खूप लांब आहे. नजीकच्या काळात आपण या ग्रहावर जाऊ शकणे शक्य नाही. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश यायलाही 8 मिनिटांचा वेळ लागतो. अशातच या ग्रहावरून प्रकाश येण्यासाठी किमान 100 वर्षाचा कालावधी लागू शकतो. म्हणूनच या ग्रहावर जाणे शक्य नाही.’ ते पुढे म्हणाले की, ‘आपल्याकडे पृथ्वीशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणूनच आपण राहत असलेल्या पृथ्वीलाच सुंदर बनवायला हवं.’

आपली प्रतिक्रिया द्या