पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी मोहिमेला वेग; तीन महिन्यात दंडातून कमावले 52 कोटी रुपये

पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्सवर तिकीट तपासणी मोहीम सातत्याने राबवली जात आहे. तिकीट नसलेल्या विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते जून 2024 या तीन महिन्यात मोठी कामगिरी केली आहे. या काळात अनेक ठिकाणी तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात आली. त्यातून विनातिकाट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंडापोटी 52.14 कोटी रुपये वसूल करण्यात आले. त्यात मुंबई उपनगर विभागातून 14.63 कोटी रुपये मिळाले आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. जून 2024 मध्ये बुक न केलेल्या सामानाच्या प्रकरणांसह 2.25 लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 14.10 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. जून महिन्यात पश्चिम रेल्वेने सुमारे 4.35 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई उपनगर विभागात 1 लाख प्रकरणे आढळली. एप्रिल ते जून 2024 या काळात 13000 विनातिकाट प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे. मुंबईतील एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्याला आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी पश्चिम रेल्वेने योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.