हिंदुस्थानची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी हरयाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. देशसेवेसाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे विनेश फोगाट म्हणाली.
आम्ही जेव्हा जंतर-मंतरवर आंदोलन करत होते. तेव्हा भाजपने आम्हाला तुच्छ समजले होते. हे सिद्ध करण्यासाठी भाजपच्या आयटी सेलने अनेक प्रयत्न केले. मात्र, ऑलिम्पिकमध्ये आम्ही सिद्ध करून दाखवले, असे विनेश फोगाटने यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी विनेशने भाजपवर टिकास्त्र सोडले. ती पुढे म्हणाली की, आम्ही आता अशा पक्षामध्ये आलो आहोत जो पक्ष रस्त्यापासून ते संसदेपर्यंत महिलांच्या सन्मानासाठी लढतोय. आज आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. खेळाडू म्हणून आम्हाला ज्या गोष्टींचा सामना करावा लागला, तशी वेळ कोणावरही येऊ नये. आमची लढाई आजही सुरू आहे. मी नेहमी तुमच्या सोबत आहे, असा विश्वास यावेळी विनेश फोगाटने व्यक्त केला.
बजरंग पुनियानेही भाजपवर टीका केली. तो म्हणाला की, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आम्ही भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र कोणीही आले नाही. यावेळी सर्व विरोधी पक्ष आमच्या सोबत उभे राहिले. फक्त भाजप आमच्या विरोधात होता. आम्ही आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे मेहनत करून काँग्रेसला अजून मजबूत करू. दरम्यान, राहुल गांधी यांची भेट घेतल्यामुळे विनेश आणि बजरंग पुनिया यांना रेल्वेकडून नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र दोघांनीही न डगमगता थेट नोकरीचा राजीनामा दिला. तसेच संपूर्ण देश या दोन खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे काँग्रेस सरचिटणीस वेणुगाोपाल यावेळी म्हणाले.