एकीकडे नवीन संसद भवनाचे उद्घाटन; दुसरीकडे कुस्तीपटूंची न्यायासाठी फरपट; अनेक जण ताब्यात

दिल्लीत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत असतानाच दुसरीकडे न्यायासाठी जंतरमंतरवर बसलेल्या कुस्तीपटूंवर पोलीस बळाचा वापर सुरू होता. विदेशात डौलाने तिरंगा फडकवणाऱ्या महिला खेळाडूंना अक्षरश: फरफटत नेले जात होते. जंतरमंतरवरील त्यांचे तंबू उखडून टाकले जात होते.

गेल्या एक महिन्यापासून राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष, भाजप खासदार बृजभूषण चरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. याविरोधात आता दिल्ली पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असून जंतरमंतरवरील तंबू उखडून टाकण्यात आले आहेत. तसेच जंतरमंतरहून नवीन संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या कुस्तीपटूंच्या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी रोखले असून अनेकांना ताब्यात घेतले आहे. यावेळी उडालेल्या गोंधळादरम्यान फोगाट भगिनी तिरंग्यासह रस्त्यावर पडल्या.

कुस्तीपटूंनी जंतरमंतरपासून ते नवीन संसद भवनापर्यंत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली होती. निर्धारित वेळेनुसार कुस्तीपटू साडे अकरा वाजता जंतरमंतरहून नवीन संसदेच्या दिशेने निघाले. कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. तसेच बॅरिकेडिंगही करण्यात आली होती. मात्र नवीन संसद भवनाकडे निघालेल्या कुस्टीपटूंनी बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी साक्षी मलिक हिच्यासह तिचा पती सत्यव्रत कादियान यांना ताब्यात घेतले. यादरम्यान साक्षीला दुखापत झाली असून पोलिसांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप सत्यव्रत याने केला आहे.

पोलिसांनी बजरंग पुनिया, विनोश फोगाट, साक्षी मलिक यांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. शांततेत मोर्चा काढण्याचा आमचा अधिकार असून दिल्ली पोलीस आम्हाला देशविरोधी म्हणत असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी फोगाट भगिनींचा फोटो शेअर केला आहे. यात संगीता फोगाट आणि विनेश फोगाट जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत. या मुलींना विदेशात आपला तिरंगा डौलाना फडकावला. आज त्याच मुलींना फरफटत नेले जात असून तिरंग्याचाही अपमान होत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.