बजरंग, विनेशवर हिंदुस्थानची मदार; आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप आजपासून

226

आशियातील सर्वोत्तम कुस्तीपटू उद्यापासून नवी दिल्लीत सुरू होणाऱया चॅम्पियनशिपमध्ये एकमेकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. खाशाबा जाधव कुस्ती स्टेडियममध्ये सहा दिवस रंगणाऱया या स्पर्धेकडे टोकियो ऑलिम्पिकची पूर्वतयारी म्हणूनही बघितले जात आहे. याप्रसंगी हिंदुस्थानची मदार असणार आहे ती बजरंग पुनिया (65 किलो) व विनेश फोगाट (53 किलो) या दोन अनुभवी खेळाडूंवरच.

30 जणांचा चमू

हिंदुस्थानने या स्पर्धेसाठी 30 जणांच्या चमूची घोषणा केली आहे. यामध्ये साक्षी मलिक, दीपक पुनिया व रविकुमार दहिया या स्टार कुस्तीपटूंचा समावेश आहे. याचसोबत अंशू मलिक, अशू व सोनम मलिक या युवा खेळाडूंनाही यामध्ये संधी देण्यात आली आहे.

तीन प्रकारांत खडाजंगी रंगणार

आशियातील स्टार खेळाडू तीन प्रकारांत सर्वस्व पणाला लावणार आहेत. पुरुषांची फ्रीस्टाइल, ग्रीको रोमन व महिलांची कुस्ती या तीन प्रकारांत खेळाडू जिंकण्यासाठी जिवाचे रान करणार आहेत. पहिल्या दोन दिवसांत ग्रीको रोमन त्यानंतर दोन दिवस महिलांची कुस्ती आणि अखेरच्या दोन दिवसांमध्ये फ्रीस्टाइल अशा लढती होणार आहेत.

कोरोना व्हायरसमुळे चीन स्पर्धेबाहेर

कोरोना व्हायरसमुळे चीनच्या खेळाडूंना आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होता येणार नाही. केंद्र सरकारकडून चीनच्या खेळाडूंना व्हिसा देण्यास नकार सांगण्यात आला आहे, अशी माहिती कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सोमवारी दिली.

आरोग्याशी निगडित घटना

चीनच्या खेळाडूंना व्हिसा नाकारल्यामुळे जागतिक कुस्ती संघटनेकडून कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न केला असता विनोद तोमर म्हणाले, सर्वसामान्य तसेच खेळाडूंच्या आरोग्याशी निगडित समस्या आहे. त्यामुळे चीनच्या खेळाडूंना व्हिसा नाकारला आहे. इतर देशांकडूनही स्पर्धा आयोजनाबाबत अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे जागतिक कुस्ती संघटनेकडून आमच्या विरोधात पाऊल उचलण्यात येईल असे वाटत नाही, असे विनोद तोमर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या