कुस्ती महासंघ निवडणुकीची सुनावणी आता 25 सप्टेंबरला

राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) निवडणुकीसंदर्भात मंगळवारी पंजाब ऍण्ड हरयाणा उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात डब्ल्यूएफआयच्या पदाधिकाऱयांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आता पुढील सुनावणी 25 सप्टेंबरला ठेवली आहे.

‘डब्ल्यूएफआय’ निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजे 11 ऑगस्टला हरयाणा कुस्ती महासंघाने न्यायालयात याचिका दाखल करून निवडणुकीवर स्थगिती आणली होती. डब्ल्यूएफआय निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार काढून घेतल्याने हरयाणा कुस्ती महासंघाने न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती.

या न्यायालयीन लढाईमुळे निर्धारित वेळेत निवडणुका न घेतल्याने जागतिक कुस्ती महासंघाने पाच दिवसांपूर्वी राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यायालयीन लढाईचा निकाल लवकर लागून निवडणुकीचा मार्ग मोकळा होणे फार गरजेचे आहे. डब्ल्यूएफआयचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे कुस्ती संघटनेची वाट लागली आहे. काही महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळे हिंदुस्थानी कुस्तीची जागतिक क्रीडाक्षेत्रात मोठी नाचक्की झाली आहे.