साहा, राहुल, कृष्णा अजूनही अनफिट; इंग्लंड दौऱयापूर्वी ‘टीम इंडिया’ची डोकेदुखी वाढली

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी आणि इंग्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेपूर्वी ‘टीम इंडिया’ची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसतात. कारण इंग्लंड दौऱयासाठी हिंदुस्थानी संघात निवड झालेले वृद्धिमान साहा, लोकेश राहुल व प्रसिध कृष्णा हे खेळाडू अजूनही अनफिट आहेत. फिटनेस टेस्ट पास केल्यानंतरच या तिघांना संघात सहभागी होता येणार आहे.

‘बीसीसीआय’ने 19 मे रोजी सर्व क्रिकेटपटूंना ‘बीसीसीआय’च्या बायो-बबलमध्ये दाखल व्हायचे आहे. त्यामुळे साहा, राहुल आणि कृष्णा यांच्याबाबत ‘बीसीसीआय’ काय निर्णय घेणार हे बघावे लागेल.

पंतसाठी पर्यायी यष्टिरक्षक

वृद्धिमान साहा व लोकेश राहुल यांची रिषभ पंतला पर्यायी यष्टिरक्षक म्हणून इंग्लंड दौऱयासाठी हिंदुस्थानच्या संघात निवड झाली आहे. प्रसिध कृष्णाची राखीव खेळाडू म्हणून संघात वर्णी लागली आहे. साहाने अखेरचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020मध्ये खेळलेला होता.

राहुलला 2019नंतर कसोटी क्रिकेटमध्ये अंतिम 11 खेळाडूंत संधी मिळालेली नाही. त्याने दोन वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध अखेरची कसोटी खेळली होती. मात्र, या तंत्रशुद्ध फलंदाजामुळे संघाला बळकटी येते एवढे नक्की. ‘बीसीसीआय’च्या बायो-बबलमध्ये दहा दिवस राहिल्यानंतर ‘टीम इंडिया’ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे.

वृद्धिमान साहा – गतवर्षी जानेवारीपर्यंत वृद्धिमान साहा हा हिंदुस्थानचा मुख्य यष्टिरक्षक होता. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱयानंतर सर्व काही बदलले. गतवर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱयावर साहाला बाकावर बसवून रिषभ पंतला संधी देण्यात आली. पंतने मिळालेल्या संधीचे सोने करताना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये मॅचविनिंग खेळी केल्या. पर्यायी खेळाडू म्हणून गेलेला पंत संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरला. आयपीएलच्या 14 व्या सत्रादरम्यान वृद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली. सध्या दिल्लीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 10 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र, दुसऱया टेस्टमध्ये तो पुन्हा पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याचा क्वारंटाइन कालावधी वाढविण्यात आला आहे.

प्रसिध कृष्णा – आयपीएलचे 14 वे पर्व स्थगित झाल्यानंतर प्रसिध कृष्णा हा कोरोना झालेला पहिला क्रिकेटपटू ठरला. कोलकाता नाइट रायडर्सचा हा खेळाडू बंगळुरूमध्ये आपल्या घरी गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळला. सध्या तो होम क्वारंटाइन आहे. 19 मे पूर्वी दोन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आणि फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर त्याचा ‘टीम इंडिया’त सहभाग होऊ शकतो.

लोकेश राहुल – आयपीएल स्पर्धेदरम्यान पंजाब पिंग्ज संघाचा कर्णधार असलेल्या लोकेश राहुलचे 3 मे रोजी अपेंडिसाइटिसचे ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी त्याला किमान 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या महत्त्वाच्या खेळाडूपुढे फिटनेसचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्याचे इंग्लंड दौऱयावर जाणे सध्या तरी तळय़ात-मळय़ातच दिसते.

आपली प्रतिक्रिया द्या