स्वरार्थरमणी…

आपल्या हुकमी, दमदार गायनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अढळ स्थान मिळकिणाऱया गानकिदुषी, स्करयोगिनी किशोरी आमोणकर यांचे नुकतेच निधन झाले. मातु:श्री गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकरांकडून आलेला जयपूर अत्रौली घराण्याचा वारसा जपत किशोरीताईंनी हिंदुस्थानच्या प्राचीन संगीत परंपरेचाही वेध घेतला. किशोरीताईंच्या या सांगितीक योगदानाला अभिवादन करणारा ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. विश्वास वसेकर यांचा हा लेख.

ग्रेस म्हणायचे, श्रेष्ठ कलावंत हा त्याच्या काळातील संस्कृतीचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असतो. किशोरी आमोणकर या श्रेणीतल्या महान कलावंत होत्या. मराठी संस्कृतीला तर त्यांनी समृद्ध केलेच, पण हिंदुस्थानी संगीतावर स्वतःची अशी एक ठसठशीत नाममुद्रा उमटवली. भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर यांच्यासारखे कलाकार सहस्रकात एखाद्दुसरेच निर्माण होत असतात.

किशोरीताईंचा जन्म १० एप्रिल १९३२ चा. येत्या १० एप्रिलला त्यांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण केली असती. घरातच त्यांना बालपणापासून गुरुमुखी आणि मातृमुखी विद्या लाभली. तत्कालीन श्रेष्ठ गायिका मोगुबाई कुर्डीकर त्यांच्या आई आणि गुरूही. जयपूर घराण्याच्या या महान गायिकेने किशोरी या रत्नाला पैलू पाडण्याचे काम केले.

नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा आणि कठोर शिस्त हे मोगुबाईंचे वैशिष्टय़. आपल्या मुलीने विज्ञानाचे उच्च शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर व्हावे हा त्यांचा दुराग्रह. परिणामी कॉलेजच्या पहिल्या वर्षी किशोरीताई नापास झाल्या. आजारपण हेही त्याचे एक कारण होते. पण आईचा शब्द आणि शिस्त त्यांनी कधी मोडली नाही. पोळी भाजताना तिला मिरी पडता कामा नये. पडलीच कधी किशोरीकडून मिरी तर… ‘‘सबंध हातावर घेऊन पोळी तव्यावर टाकली नसशील… तशी टाकली नाही तर तिला चिकटा येतो, वळी पडते आणि ती पोळी चांगली दिसत नाही, चांगली लागत नाही. कारण तेवढाच भाग कच्चा राहतो.’’ अशी त्यांची दमदाटी असे.

आईच्या शिस्तीची सर्वात मोठी चपराक त्यांना १९६४ साली बसली. ‘गीत गया पत्थरोने’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले. जगभर ती गाणी गाजली. कित्येक फोन पाकिस्तानातून आले की या गायिकेचा पत्ता, फोन नंबर हवा आहे. किशोरी मोहरून गेली असेल, पण घरात मोठे वादळ झाले. सहा महिने मोगुताईंना झोप नव्हती. शेवटी त्या स्पष्टपणे म्हणाल्या, ‘‘किशोरी, तुला सिनेमात यापुढेही जर गायचे असेल तर एक गोष्ट तुला पाळावी लागेल. माझ्या तंबोऱ्यांना तू यापुढे स्पर्श करायचा नाहीस.’’ आई जिवंत असेपर्यंत त्यांनी पुन्हा सिनेमाचे नाव काढले नाही. पुढे अपवादही केला, तो दृष्टी (१९९१) या एकाच कलात्मक सिनेमाला संगीत देण्याचा.

किशोरीताई गाण्यातल्या नुसत्या मेस्त्री नव्हत्या, तर शास्त्रीही होत्या. त्यांनी आपल्या गाण्याचं सौंदर्यशास्त्रही मांडलं आहे. ते थोडक्यात असे – प्रत्येक राग हाच भाव असतो. तो भाव प्रकट करणं म्हणजेच राग प्रकट करणं. रागाच्या त्या एकाच स्वराचा अनुभव घेण्यासाठी सतत साधना करावी लागते, कारण सूर हा भाव आहे. रागाचा भाव करुण असला तरीही तो व्यक्त होतो तेव्हा आनंदाचीच अनुभूती देतो. तो आनंद कलात्मक असतो. करुण रसातून निर्माण होणाऱया या आनंदस्वरूप भावनेला रसिकांच्या सहाय्याने व्यक्त करता येण्याची क्षमता कलावंतामध्ये निर्माण होणं म्हणजेच खरं तर संगीत.
अठरापासून विसाव्या शतकापर्यंत संगीतामध्ये स्थूलमानाने अभिजातवादाचे अधिराज्य होते. किशोरीताईंनी संगीतात ‘भाववाद’ आणला. भावदर्शनाकडे झुकता कल आणि आकृतिबंधाकडे तुलनेने दुर्लक्ष हे भाववादाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. भाववादी गायकीमध्ये मानवी मनाच्या वेगळ्या भावांचे दर्शन, त्या अन्वये स्वरांचे वेगवेगळ्या गाजांचे म्हणजे व्हॉल्यूमचे अनंत दर्जे यांचा मुक्तपणे वापर आणि त्या मानाने आकृतिबंधाचा ढिलेपणा, सैलपणा वगैरे. वामनराव देशपांडे लिहितात, भाववाद करुण, वीर, शृंगार वगैरे रसांची निष्पत्ती करणारा असतो. तो वस्तू, दृश्य अथवा घटना या मानवी मर्यादेतच रमतो. किशोरीताईंनी गाण्यातून मांडला तो हा भाववाद.

आईच्या संगीताचा ‘जयपुरी’ वारसा किशोरीताईंनी कितीतरी उंचीवर नेऊन ठेवला. कंठ संगीतावर त्यांनी विपुल परिश्रम घेऊन तेजस्वी, नवनवोन्मेषशाली प्रतिभेच्या सहाय्याने हिंदुस्थानी संगीतावर स्वतःची मुद्रा उमटवली. शास्त्रीय संगीताबरोबर ठुमरी, भजन, ख्याल, भावगीत अशा अनेक गायन प्रकारात स्वतःचे वैशिष्ट्य निर्माण केले. ‘जाईन विचारीत रानफुला’ किंवा ‘हे श्यामसुंदर राजसा’सारखी त्यांची अनवट भावगीतं सहज गुणगुणण्याचा प्रयत्न करून पाहा. जे नुसते बाथरूम सिंगर आहेत त्यांचा आवाजही निघणार नाही.

किशोरी आमोणकरांवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. गोपाळकृष्ण भोबे, दत्ता मारुलकर, मुकुंद संगोराम, प्रभाकर पाध्ये, ग्रेस, अच्युत गोडबोले, सुलभा पिशवीकर ही सहज आठवलेली काही नावे. ७ सप्टेंबर १९८० रोजी पुण्यात झालेल्या त्यांच्या ‘तोचि नादू सुस्वर झाला’ या कार्यक्रमाविषयी ए. पी. नारायणगावकरांनी लिहिलेला लेख ‘स्वरयोगिनी’ या ग्रंथात समाविष्ट आहे. ख्यालाशिवाय कोणताही प्रकार न गाण्याचा ‘जयपूर’चा आग्रह सोडून शब्द आणि स्वर यांची सांगड घालण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे या लेखात त्यांनी स्वागत केले आहे. आरती अंकलीकर एके ठिकाणी लिहितात, ताईंनी आम्हाला यमन गायला तर शिकवलेच, पण तो गाताना यमन कसे व्हायचे तेदेखील शिकवले. प्रभाकर पाध्ये यांच्या त्रिवारीची फुले’ या संग्रहातील कोयलिया ना बोले डार’ हा किशोरीवरील अप्रतिम ललित लेख पदवीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्षे शिकविण्याचे भाग्य मला लाभले.

आपल्या प्रदीर्घ संगीत साधनेबद्दल अनेक मानसन्मान किशोरी आमोणकरांना लाभले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८५), पद्मभूषण (१९८७), पद्मविभूषण (२००२) इ. किशोरीताई गात होत्या त्या काळात आम्ही त्यांना पाहिले, ऐकले आहे हे पुढच्या पिढ्यांना आपण सांगू तेव्हा त्यांना आपला हेवा वाटेल.