मी आनंदी आहे, समाधानी नाही; बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण

‘महत्त्वाकांक्षी व हौशी माणूस कधीही पूर्ण समाधानी होत नाही. माझ्या वयाच्या 99 वर्षांत परमेश्वराने मला खूप काही मिळविण्याची ताकद दिली. त्याप्रमाणे मी प्रयत्नही करीत गेलो. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याचा मोठा विषय आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास, वाचन, लेखन करून स्वतः काहीतरी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे. त्यामुळेच वयाच्या 99 वर्षांमध्ये मी आनंदी आहे; पण समाधानी नाही. मला हिंदुस्थानातच पुनर्जन्म मिळावा आणि अपुरे सर्व काही पूर्ण व्हावे,’ अशी भावना ‘पद्मविभूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.

वयाची 80 वर्षे शिवचरित्र प्रसाराचे काम, तब्बल 5 लाख किमीचा प्रवास, ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाच्या 17 आवृत्त्या, जगभरात 25 हजार व्याख्याने, 3 कोटी रुपयांचा दानधर्म आणि आशियातील दुसऱया क्रमांकाचे महानाटय़ ‘जाणता राजा’चे 1200 प्रयोग व एक कोटी प्रेक्षक असा थक्क करणारा प्रवास करीत वयाच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱया ‘पद्मविभूषण’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळातर्फे भव्य रंगावली व 99 दीप प्रज्वलित करून मानवंदना देण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्रामातील बाबासाहेबांचे सहकारी वसंतराव प्रसादे, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. प्रा. अक्षय शहापूरकर आणि ‘श्रीरंग कलादर्पण’च्या 7 कलाकारांनी 27 तासांत 20 बाय 15 फूट रंगावली साकारली. रंगावलीमध्ये बाबासाहेबांचे व्यक्तिचित्र, त्यांचे शिवचरित्र प्रसाराचे पैलू दाखविण्यात आले आहेत.

भूषण गोखले म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे म्हणजे चालता-बोलता इतिहास आहे. शिवरायांविषयी पुस्तके, लेखन व भाषणांमधून ते आपले जीवन व्यतीत करीत आहेत. स्वराज्य आणि सुराज्य यांच्या अनेक गोष्टी याच इतिहासातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत.   दरम्यान, शिवशाहीरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘प्रारंभ शतकपूर्तीचा’ हे भव्य रंगावली प्रदर्शन सदाशिव पेठेतील पेरूगेट भावे स्कूल प्रशालेमध्ये शुक्रवार, 30 जुलैपर्यंत सकाळी 11 ते 4 पाहता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या