फार्मसी प्रवेशाचा गुंता कायम; विद्यार्थी त्रस्त

>>गजानन चेणगे

औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम शाखेतील प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेचे घोंगडे नको तितके भिजत पडले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मौल्यवान एक वर्ष वाया जाण्याची वेळ आली आहे. प्रवेशप्रक्रियेचा गुंता सुटणार तरी केव्हा आणि शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार तरी केव्हा, या चिंतेने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना ग्रासले आहे.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची औषध निर्माण शास्त्र शाखेच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया यंदा लांबली आहे. नव्याने निर्माण झालेल्या काही औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांची नावे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट न झाल्याने या महाविद्यालयांनी प्रवेशप्रक्रियेवर आक्षेप नोंदविला होता. त्यामुळे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेवर स्थगितीचे आदेश सीईटी सेलने महाविद्यालयांना दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील असंख्य महाविद्यालये अडचणीत आली आहेत. त्याचप्रमाणे पदविका, पदकी, पदव्युत्तर औषधनिर्माण शास्त्र् अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे असंख्य विद्यार्थी अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

इतर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन ही महाविद्यालये सुरू झाली असून, प्रथम सत्राच्या परीक्षाही झाल्याचे आढळून येत आहे. मात्र, इथे प्रवेश प्रक्रियेतच घोडे अडल्याने शैक्षणिक वर्षाची सुरुवातच होऊ शकलेली नाही. प्रवेशप्रक्रियेचा गुंता सुटण्याऐवजी कालापव्यय होत असल्याने असंख्य विद्यार्थी नाईलाजाने अन्य शाखेकडे कळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशास फटका बसू शकतो. वास्तविक ही प्रवेशप्रक्रिया वेळेत होणे अपेक्षित असताना सीईटी सेलच्या गलथान कारभाराचा नाहक त्रास इतर महाविद्यालयांना सोसाला लागत आहे.

24 हजार 551 जागा अद्यापि रिक्त

महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा कक्षाकडून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नोंदणी प्रक्रियेत राज्यातील 497 औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील 46 हजार 512 जागांसाठी 50 हजार 556 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेऱयांमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यापैकी 21 हजार 961 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, उर्वरित 24 हजार 551 जागा अद्यापि रिक्त आहेत. – श्रीरंग काटेकर, सातारा