>>प्रसाद ताम्हनकर
चीनचे जगभरात चर्चेत असलेले ‘चांग ई-6’ हे अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अत्यंत सफलतेने उतरले आणि आपली मोहीम पूर्ण करून हे यान आता चंद्रावरून मातीचे नमुने गोळा करून पृथ्वीच्या दिशेने परत येत आहे. लवकरच हे यान पृथ्वीवर लँड होईल आणि चीन पुन्हा एकदा अंतराळ क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित करेल हे नक्की. चंद्रावरून यापूर्वीदेखील मातीचे नमुने गोळा करून आणण्यात आले होते. मात्र या वेळी चीनने राबवलेली मोहीम ही खास होती. कारण आजवर जगातील कोणत्याही देशाने न राबवलेली चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची मोहीम चीनने प्रत्यक्षात उतरवली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पोहोचणारा चीन हा जगातील पहिला देश बनला आहे.
चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने (CNSA) दिलेल्या माहितीनुसार, गत रविवारी चीनच्या वेळेनुसार सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी ‘चांग ई-6’ हे अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अर्थात एटकेन बेसिनवर यशस्वीरीत्या उतरले. 3 मे रोजी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. आजवर मानवी कक्षेच्या बाहेर राहिलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे आणि तेथील दुर्मिळ माती आणि खडकांचे नमुने गोळा करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. तिथे असलेल्या एका मोठय़ा विवरामधून आणि जुन्या खडकांमधून हे नमुने गोळा केले जातील. चंद्राचा हा भाग विशेष मानला जातो. कारण तो पृथ्वीवरून दिसत नाही.
या मोहिमेकडे जगभरातील अंतराळ तज्ञांचे आणि अंतराळप्रेमींचे लक्ष लागले होते. ही मोहीम चीनसारख्या प्रगत देशासाठीदेखील अत्यंत अवघड होती. चंद्राच्या या भागात अंतराळयानाशी संपर्क साधणे हे अत्यंत कठीण आहे. अर्थात, 2019 मध्ये चीनने आपले ‘चांग ई-4’ हे अंतराळयान सुखरूपपणे उतरवून आपला आत्मविश्वास बळकट केलेला होता. वेनचांग या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून झेप घेतल्यानंतर ‘चांग ई-6’ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापूर्वी चंद्राची एक प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर लँडरचा एक भाग ऑर्बिटरपासून वेगळा झाला आणि यशस्वीपणे चंद्राच्या एटकेन बेसिनवर उतरला.
चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशननुसार (CNSA), या मोहिमेत एका विशेष यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. चंद्रावर उतरल्यानंतर तिथल्या अडचणी, अडथळे यांचा शोध हे यान स्वतः घेईल आणि ते अडथळे स्वतः दूर करण्यास सक्षमदेखील असेल अशी ही यंत्रणा आहे. या यानात बसवलेल्या व्हिजिबल लाइट कॅमेऱयाने चंद्राच्या पृष्ठभागावरील चमक आणि अंधार यांचे विश्लेषण करून लँडर उतरण्याची सुरक्षित जागा निश्चित करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यानंतर निवडण्यात आलेल्या सुरक्षित जागी उतरण्यापूर्वी लँडरने या जागेपासून सुमारे 100 मीटर (328 फूट) उंचीवर काही वेळ भ्रमण केले आणि त्यानंतर थ्रीडी लेजर स्कॅनरची मदत घेत ते सुरक्षितपणे खाली उतरले.
यानाने गोळा केलेल्या माती आणि खडकांच्या नमुन्याचे परीक्षण करण्याची पहिली संधी ही चीनच्या संशोधकांना मिळणार आहे. काही प्रमुख संशोधक यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. यातील काही संशोधकांनी यापूर्वी अपोलो मिशन तसेच चीनच्या पूर्वीच्या चांद्र मोहिमांद्वारे आणल्या गेलेल्या चंद्रावरील नमुन्यांचे परीक्षण केलेले आहे. मात्र आजवर चंद्राच्या दुर्लक्षित राहिलेल्या भागातून आणलेले नमुने तपासण्यासाठी ते जास्त उत्सुक आहेत. चंद्राच्या या भागात बर्फ असल्याचा अंदाज अनेक तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे हे नमुने जगभरातील शास्त्रज्ञांसाठी विशेष महत्त्वाचे असणार आहेत. या नमुन्यांमध्ये आजवर पाहण्यात न आलेले एखादे वेगळे रसायन सापडण्याची शक्यतादेखील तज्ञांना वाटते आहे.
चंद्राच्या आजवर अज्ञात असलेल्या भागातून आणलेले हे नमुने ग्रह कसे तयार होतात, सूर्यमालेत पाण्याची उत्पत्ती कशी झाली, थर कसे बनतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मदत करून शकतात असे संशोधकांना वाटते आहे. गोळा केलेले हे नमुने आहे त्या स्थितीत राहावेत यासाठी यानात विशेष व्यवस्था केलेली आहे. चंद्रावर मानवी वस्तीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.