WTC Final Ind vs Aus – कांगारुंच्या वेगवान गोलंदाजीची धार बोथट, प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

आयसीसीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये पार पडणार आहे. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या तुल्यबळ संघात हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगणार आहे. 7 जूनपासून हा सामना खेळवला जाईल. मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला दुखापत झाली आहे. त्यामुळे डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळू शकणार नाही. आयसीसीने ही माहिती दिली आहे. नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये जोश हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मैदानात उतरला होता. मात्र दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम खेळू शकला नव्हता.

दरम्यान, जोश हेझलवूड हा एशेस मालिकेपूर्वी दुखापतीतून बरा होऊन संघात परतण्याची आशा आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम लढतीत तो संघात नसल्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाजीचा मारा बोथट होण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी अष्टपैलू मायकल नेसर यांचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या काउंटी सत्रामध्ये मायकल नेसर याने दमदार कामगिरीची नोंद केली आहे. 33 वर्षीय नेसरने पाच लढतींमध्ये 19 बळी घेतले. तसेच ससेक्सविरुद्ध खेळताना त्याने फलंदाजीत शतकही ठोकले होते. मात्र त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जास्त अनुभव नाही. त्याने आतापर्यंत फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत. मात्र पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कसोबत अंतिम 11मध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियन संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, एलेक्स केरी (यष्टीरक्षक), कमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हीस हेड, जोश इंगलीस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, टॉड मर्फी, मायकल नेसर, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

स्टँडबाय खेळाडू – मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ.