WTC Final India vs New Zealand – महामुकाबल्यात कोण जिंकणार? ग्रहताऱ्यांच्या माध्यमातून मांडले भाकीत

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जूनपासून सुरू होणार आहे. हिंदुस्थानी संघ न्यूझीलंडच्या संघाशी भिडणार आहे. हे दोन्ही संघ अत्यंत ताकदवान असून त्यांच्यातील लढत ही रोमहर्षक ठरणार आहे. या अजिंक्यपदाचा मानकरी कोण असेल, याबाबत कयास लावले जात आहेत.

माजी क्रिकेटपटू आणि हिंदुस्थानी संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्यांच्या मते कोणता संघ विजयी होईल याबाबतचे भाकीत वर्तवले आहेत. गावस्कर हे या सामन्याचे समालोचन करणार असून , यासाठी ते इंग्लंडमध्येच आहेत. अजिंक्यपदाचा हा सामना पूर्वी लॉर्डस इथे खेळवण्यात येणार होता, मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर हा सामना साऊथहॅम्पटन इथे खेळवण्याचे निश्चित करण्यात आले.

गावस्कर म्हणतात हिंदुस्थानचे पारडे जड

काहीं क्रिकेटतज्ज्ञांनी दावा केला आहे की या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ 2 कसोटी सामने खेळला असून त्याचा त्यांना फायदा होईल. तर काहींचं म्हणणं आहे की हिंदुस्थानी कसोटी संघ हा जवळपास 1 महिना कोणताही सामना खेळलेला नसल्याने तो नव्या दमाने मैदानात उतरेल, ज्याचा त्यांना फायदा होईल. न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्येच सामने खेळला असल्याने त्यांनी इथल्या वातावरणाशी आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेतले आहे. दुसरीकडे हिंदुस्थानी संघाला 1 महिन्याचा आराम मिळाल्याने तो ताज्या दमाचा आणि उत्साहाने सळसळता संघ असणार आहे. अशा परिस्थितीत कोण जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. टाईम्स ऑफ इंडियाला गावस्कर यांनी दिलेल्या मुलाखतीत जागतिक कसोटी अजिंक्यपदाबाबत त्यांची निरीक्षणे मांडली आहेत. गावस्कर यांनी म्हटले की या स्पर्धेतील दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत.

सचिन म्हणतो न्यूझीलंडचे पारडे जड

न्यूझीलंड आणि हिंदुस्तानी या दोन्ही संघांची कागदावर तुलना केल्यास कोण जिंकेल हे सांगण अत्यंत कठीण होत आहे. दोन्ही संघ हे अत्यंत ताकदवान असून हा सामना दोन्ही संघांसाठी त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडमधील हवामान हे बऱ्यापैकी समान आहे. न्यूझीलंडप्रमाणेच इंग्लंडच्या खेळपट्ट्याही वेगवान गोलंदाजांना साथ देण्याऱ्या असतात. यामुळे न्यूझीलंडच्या संघाला अधिक संधी असल्याचे काही क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही न्यूझीलंडचं पारडं किंचित जड असल्याचं म्हटलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने सचिन तेंडुलकर याचे या सामन्याबाबतचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सचिनने म्हटलंय की “न्यूझीलंडचं पारडं किंचित जड असेल कारण त्यांनी इंग्लंडविरोधात दोन कसोटी सामने खेळले आहेत. हिंदुस्थानी संघाने मात्र सराव सामन्याव्यतिरिक्त इंग्लंडमध्ये या सामन्यापूर्वी सामना खेळलेला नाहीये. हा सराव सामनाही संघातील खेळाडूंमध्येच झाला होता.” तेंडुलकर याने म्हटलंय की इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतरही खेळवता येऊ शकली असती. तसं झालं असतं तर दोन्ही संघ हे सर्वार्थाने समसमान होऊन एकमेकांसमोर उभे ठाकले असते.

गावस्कर यांनी म्हटलंय की हिंदुस्थानी संघाकडे चांगले फलंदाजही आहेत आणि उत्कृष्ट गोलंदाजही आहेत. हे पाहाता हिंदुस्थानी संघच हा सामना जिंकेल असे गावस्कर यांनी म्हटले आहे. हवेत आर्द्रता नसेल आणि गारठा नसेल तर हिंदुस्थानी संघ हा स्विंग गोलंदाजांचा उत्तम पद्धतीने मुकाबला करू शकतो असं गावस्कर यांनी म्हटलंय. इंग्लंडविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात डेव्हॉन कॉनवे याने द्विशतक झळकावले होते. त्याच्याबाबत बोलताना गावस्कर म्हणाले की हिंदुस्तानी गोलंदाजांचा कॉनवे कसा मुकाबला करतो हे पाहणं उत्सुकतेचे असेल.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. शार्दूल ठाकूरऐवजी उमेश यादवला या संघात पसंती देण्यात आली आहे. तसेच मयांक अग्रवाल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर व लोकेश राहुल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. हिंदुस्थानचे दोन संघ एकाच कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहेत. विराट कोहलीचा संघ इंग्लंमध्ये कसोटी मालिका खेळेल. शिखर धवनचा संघ श्रीलंकेत झटपट मालिकेत यजमानांशी दोन हात करील. शिखर धवनच्या टीम इंडियासाठी यावेळी राहुल द्रविड यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मंगळवारी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले.

टीम इंडियाचा संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहीत शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज.

ग्रहताऱ्यांची दशा आणि दिशा यांच्या आधारे भाकीत वर्तवणारे ज्योतिषी राजेंद्र जोशी यांनी या सामन्यासाठीची प्रश्न कुंडली 17 जून 2021 च्या पहाटे 00.03 वाजता मांडली होती. यामध्ये त्यांनी सांगितलं की नवांशी कुंडलीतील षष्ठेश सूर्य हा हिंदुस्थानचा ग्रह आहे आणि सूर्य हा मंगळाच्या नक्षत्रात होता. प्रतिस्पर्धी संघ असलेल्या न्यूझीलंडसाठी नवांशी कुंडलीतील व्ययेश हा शनि ग्रह असून शनि हा चंद्राच्या नक्षत्रात आहे. जोशी म्हणाले की कुंडली मांडत असताना 12 भाव पाहाणे महत्वाचे असतात.यापैकी 6 भाव विजयासाठी आवश्यक असतात. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे भाकीत वर्तवण्यासाठी मांडलेल्या कुंडलीत जोशी यांना दिसून आले की हिंदुस्थानी संघासाठी 3 भाव अनुकूल आहे. न्यूझीलंडबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्यासाठी 2 भाव अनुकूल आहेत. यावरून हिंदुस्थानी संघाचे पारडे जड असल्याचा निष्कर्ष जोशी यांनी काढला आहे. असं असलं तरी हिंदुस्थांनी संघ जिंकेल याची शक्यता कमी असल्याचं जोशी यांचं म्हणणं आहे. सूर्य आणि शनि हे परस्परविरोधीग्रह असून अत्यंत तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांचे मूळ ग्रह परस्परांचे शत्रू आणि नक्षत्र स्वामी सम, अशा परिस्थितीत असल्याने सामना निर्णायक न होता ड्रॉ होईल अशी शक्यता जोशी यांनी वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या