WTC Final – 3 कारणे ज्यामुळे हिंदुस्थानी संघाने ओढवून घेतला पराभव

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम मुकाबला न्यूझीलंडने सहजपणे जिंकला. या महामुकाबल्यामध्ये न्यूझीलंडने हिंदुस्थानी संघाचा 8 गडी राखत पराभव केला. या स्पर्धेत गेली दोन वर्ष भल्या भल्या संघांना आसमान दाखवणारा हिंदुस्थानी क्रिकेट संघ हा या सामन्यात चमकदार कामगिरी दाखवू शकला नाही. संघात मातब्बर खेळाडू असतानाही हिंदुस्थानी संघावर या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. या पराभवामागची कारणे काय होती ते पाहूयात.

दुसऱ्या डावात सलामीवीर फ्लॉप

या सामन्याच्या पहिल्या डावात सलामीवीर शुभमन गिल आणि रोहीत शर्मा यांची सावध सुरूवात केली होती. सांभाळून खेळताना त्यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या डावात रोहीतने 34 आणि गिल याने 28 धावा केल्या होत्या. हे दोघे मोठी खेळी साकारू शकले असते, मात्र दोघांना त्यात यश आलं नाही. रोहीत या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती, मात्र तो ही अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. दुसऱ्या डावात ही जोडी आणखीनच लवकर बाद झाली. गिल 8 धावांवर बाद झाला तर रोहीत 30 धावांवर बाद झाला. हे दोघे लवकर बाद झाल्याने मधल्या फळीवर दबाव आला होता.

cheteshwar-pujara

मधली फळीही कोलमडली

विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यासारखे फलंदाज मिळणं ही कोणत्याही संघासाठी स्वप्नवत गोष्ट आहे. या तिघांनीही क्रिकेटरसिकांची निराशा केली. ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविड याच्या तोडीस तोड चेतेश्वर पुजारा असल्याचं कौतुक केलं जाऊ लागलं होतं. मात्र या सामन्यात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पुजाराने पहिल्या डावात 8 आणि दुसऱ्या डावात 15 धावा केल्या होत्या. कोहलीने पहिल्या डावात 44 धावा केल्या मात्र दुसऱ्या डावात तो 13 धावांवर बाद झाला. रहाणेने पहिल्या डावात 49 धावा केल्या मात्र दुसऱ्या डावात त्याला 15 धावाच करता आल्या.

wtc-final-indian-team-balling

जाडेजानेही केले निराश

खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असतानाही विराट कोहलीने अष्टपैलू रवींद्र जाडेजाला संघात घेतलं होतं. जाडेजा हा खरोखर गुणी खेळाडू आहे आणि त्याने वेळोवेळी त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे, मात्र या सामन्यात तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्याच प्रमाणे जसप्रीत बुमराह यानेही क्रिकेटरसिकांना निराश केले. संपूर्ण सामन्यात बुमराहला एकही बळी टीपता आला नाही. दुसऱ्या डावात अत्यंत अनुभवी असलेल्या इशांत शर्मा याला पण एकही बळी टीपता आला नाही.

Ravindra Jadeja

न्यूझीलंडच्या शेपटाने दिला तडाखा

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात हिंदुस्थानी गोलंदाजांनी टीच्चून गोलंदाजी करत प्रमुख फलंदाजांना लवकर बाद करण्यात यश मिळवलं होतं. पहिल्या डावात त्यांची अवस्था 7 बाद 192 अशी झाली होती. त्यावेळी न्यूझीलंडचा संघ हिंदुस्थानी संघापेक्षा 25 धावांनी पिछाडीवर होता. यावेळी न्यूझीलंडच्या तळाच्या 3 फलंदाजांनी 57 धावा चोपून काढल्या. टीम साऊदी आणि केन विल्यम्सन या दोघांनी केलेली 8 व्या गड्यासाठीची 29 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. 9व्या गड्यासाठी 13 धावांची आणि 10 व्या गड्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 15 धावांची भागीदारी रचली होती. या फलंदाजांनी न्यूझीलंडला 32 धावांची लहानशी का होईना पण आघाडी मिळवून दिली. ही आघाडी भरून काढत पुढे धावसंख्या रचताना हिंदुस्थानी संघाची दयनीय अवस्था झाली होती.

wtc-final-new-zealand-team

आपली प्रतिक्रिया द्या