WTC Final ‘उडता’ गिल, हवेत सूर मारत टिपला टेलरचा अफलातून झेल

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा आज पाचवा दिवस आहे. पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर या कालच्या नाबाद जोडीला टिच्चून गोलंदाजी केली. खेळपट्टी आणि वातावरणाचा फायदा उठवत मोहम्मद शमी याने पहिल्या काही षटकांमध्येच टेलरला टिपला.

न्यूझीलंडच्या डावाच्या 64 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर शुभमन गिल याने शॉर्ट कव्हरला टेलरचा अफलातून झेल घेतला. गिलने हवेमध्ये सूर मारत टेलरला ड्रेसिंग रुमचा रस्ता दाखवला. बाद होण्यापूर्वी टेलरने 37 चेंडूत 11 धावांची खेळी केली.

सोशल मीडियावर कौतुक

शुभमन गिल याने घेतलेल्या झेलचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. या एका झेलमुळे त्याने टिकाकारांची तोंड बंद केली असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले.

पाऊस ठरतोय ‘व्हिलन’

दरम्यान, पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द झाल्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत पाऊस व्हिलन ठरत आहे. आज पाचव्या दिवशीही पहिल्या एक ते दीड तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे आगामी जवळपास दीड दिवसात सामन्याचा निकाल लागणे अशक्य वाटत आहे.

ICC वर सेहवाग वैतागला, लोकांनीही मीमद्वारे केली धुलाई

…तर विजेतेपद विभागून दिले जाणार

दरम्यान, अंतिम लढतीचा हा पाचवा दिवस असून उद्याचा अतिरिक्त दिवस बाकी आहे. फलंदाजांनी हाराकिरी केल्यास आणि गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली तरच या लढतीचा निकाल लागू शकतो. तसेच पाऊस देखील या लढतीच्या निकालावर परिणाम करू शकतो. सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघात विजेतेपद विभागून दिले जाईल.

WTC Final कोणताही फॉर्म्यूला वापरा, पण विजेता एकच हवा! लिजेंड खेळाडूचे आयसीसीला साकडे

आपली प्रतिक्रिया द्या