WTC Final ला गालबोट, न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरवर वर्णद्वेषी टिप्पणी

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीला प्रेक्षकांनी गालबोट लावले आहे. लढतीच्या पाचव्या दिवशी मैदानावर लाजिरवाणा प्रकार घडला. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर याच्यावर दोन प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिका केल्याचा आरोप करण्यात आला असून यानंतर त्यांना मैदानातून बाहेर काढण्यात आले. आयसीसीचे जनरल मॅनेर क्लेअर फरलॉन्ग यांनी ट्विट करून या कारवाईबाबत माहिती दिली आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, डॉमिनिक डा सुजा नावाच्या एका ट्विटर युजरने आयसीसीच्या जनरल मॅनेजरला टॅग करत न्यूझीलंडच्या खेळाडूवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आल्याची तक्रार केली. ‘मैदानावर उपस्थित प्रेक्षकांच्या गैरवर्तनावर नजर ठेवणारे कोणी आहे की नाही. येथे एक व्यक्ती न्यूझीलंड संघाबाबत अपशब्द वापरत आहे. संपूर्ण दिवसभर तो गैरवर्तन करत होता. एवढेच नाही तर रॉस टेलरबाबतही वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली’, असे ट्विट डॉमिनिक यांनी केले.

दरम्यान, डॉमिनिक यांच्या ट्विटनंतर आयसीसीच्या जनरल मॅनेजरने सुरक्षारक्षकांना घटनास्थळी पाठवले आणि गैरवर्तन करणाऱ्या दोन प्रेक्षकांना मैदानातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आले. याबाबत आयसीसीचे जनरल मॅनेर क्लेअर फरलॉन्ग यांनी माहिती देताना सांगितले की, दोन व्यक्तींची ओळख पटवण्यात आली असून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. सामना सुरू असताना अशा कोणत्याही गैरवर्तनाचे आम्ही कदापी समर्थन करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

गोलंदाजांमुळे कमबॅक

दरम्यान, पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिंदुस्थानने न्यूझीलंडवर 32 धावांची आघाडी घेतली होती. टीम इंडियाने रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीविरांना गमावले असून विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा नाबाद आहेत. तत्पूर्वी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी करत संघाला कमबॅक करण्याची संधी दिली. मोहम्मद शमी 4, इशांत शर्मा 3, आर. अश्विन 2 आणि रविंद्र जाडेजाच्या एका बळीच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा डाव 249 धावांत गारद केला आणि मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.

WTC Final ‘उडता’ गिल, हवेत सूर मारत टिपला टेलरचा अफलातून झेल

विल्यमसनची झुंज

न्यूझीलंडचे फलंदाज एकामागोमाग एक असे पॅव्हेलियनमध्ये परतत असताना कर्णधार केन विल्यमसन याने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने संयमी फलंदाजी केली. पण त्याचे अर्धशतक एक धावेने हुकले. केन विल्यमसनने 177 चेंडूंत सहा चौकारांसह 49 धावा केल्या. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर तो स्लीपमध्ये उभ्या विराट कोहलीकरवी झेलबाद झाला.

आपली प्रतिक्रिया द्या