NeoCov कोरोनाचे अत्यंत प्राणघातक रुप सापडल्याचा चिनी शास्त्रज्ञांचा दावा

दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा अवतार सापडला आहे. पूर्वीच्या रुपांपेक्षा कोरोनाचे हे नवे रुप अत्यंत प्राणघातक आणि वेगाने बाधित करणारे असल्याचं चीनमधील शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. निओकोव्ह (NeoCoV) असं या नव्या अवताराचं नाव आहे. कोरोनाचे नवे रुप इतके घातक आहे की यामुळे दर 3 व्यक्तींपैकी एका व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

चीनमधील वुहान इथल्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला असून त्याबाबतचे वृत्त रशियातील स्पुटनिक या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. डेल्टा, डेल्टा प्लस आणि ओमायक्रॉन या कोरोनाच्या तीन रुपांनी जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमायक्रॉनमुळे आलेली लाट अजून ओसरलेली नाहीये. अशातच कोरोनाचं नव रुप सापडल्याने चिंता वाढली आहे.

‘निओकोव्ह’ चा विषाणू नवा नाहीये, तो MERS-CoV विषाणूशी मिळता जुळता आहे. चिनी शास्त्रज्ञांना दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये ‘निओकोव्ह’ चा विषाणू सापडला आहे. वुहामधील युनिव्हर्सिटी अँड चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस, इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी सांगितलंय की वटवाघळाच्या शरीरातील या विषाणूने फक्त एकदा रुप बदललं की तो मानवालाही बाधित करू शकेल. या विषाणूमुळे दर तीन बाधितांपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती या शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.