प्रेम, आपुलकी, जिव्हाळा

591
  • शिरीष कणेकर

माझ्या षष्ठ्यब्दीपूर्ती कार्यक्रमात वक्ता म्हणून सुनील गावसकरला बोलवावं असं मला वाटलं. मी भीत भीत त्याला फोन केला. भीत भीत अशासाठी की बऱ्याच वर्षांत संपर्क नव्हता. आता एकदम फोन करायचा आणि तोही आपल्या कामासाठी, माझं मन मला खात होतं.

१९७६ साली सुनील गावसकरने ‘क्रिकेट-वेध’ या माझ्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती. त्याच्या हस्ताक्षरातील प्रस्तावनेचे कागद मी अजून जपून ठेवलेत. ‘संगम’च्या प्रीमियरचे निमंत्रणही मी असेच सांभाळून ठेवलंय.

‘सुनील ओळखलंस का?’ माझी ओळख दिल्यावरही मी विचारलं.

‘म्हणजे काय ? काय विचारतोयस? एवढा म्हातारा झालो का मी?’ सुनीलच्या या प्रतिप्रश्नानं माझा जीव भांड्यात पडला.

माझा फोन करण्यामागचं कारण कळल्यावर तो पलीकडून ओरडला, `xxx xx साठ वर्षांचा झालास घोड्या?’

माझा धास्तावलेला जीव भांड्यातल्या भांड्यात नाचायला लागला. त्यानं तत्काळ निमंत्रण स्वीकारलं. त्याच्या कचकचीत मराठी शिवीनं मला मनापासून आनंद दिला. त्याला माझ्याविषयी वाटणाऱया आत्मीयतेचं, जिव्हाळ्याचं, जवळीकीचं ती शिवी ही प्रतीक होती.

१९८५ साली लता मंगेशकरच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन हे केवळ स्वप्नरंजन असू शकत होतं. परंतु माझ्या पुस्तकाला ‘यादों की बारात’ तिची प्रस्तावना लाभल्यामुळे झुरळाला गरुडाचे पंख फुटले होते. विचारायला काय हरकत आहे, असं माझं धिटुकलं मन मला विचारीत होतं. ती प्रस्तावना लिहील असं तरी कधी वाटलं होतं? माझ्याआधी तिनं फक्त सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली होती. म्हणजे सुरेश भटानंतर डायरेक्ट मी? प्रस्तावनेचा विषय तिच्यापाशी काढायला माझी जीभ रेटत नव्हती. शेवटी तीच एकदा फोनवर म्हणाली, ‘तुम्हाला माझ्यापासून काही लिहून हवंय का?’

मी सटपटलो. माझी अगदी बोबडी वळली नाही तरी तत-पप झालंच. मी पटदिशी सांगून मोकळा झालो. ती लगेच तयार झाली. सगळेच ग्रह त्या दिवशी माझ्यावर फिदा असावेत. तिनं विस्तृत रसभरीत प्रस्तावना लिहून दिली. मी प्रस्तावना हातात घेऊन भांबावून उभा राहिलो. मला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. मग तीच बोलली, ‘आवडली ना प्रस्तावना? आपलं पुस्तक चांगलं जायला हवं.’

आपलं पुस्तक? लता माझ्या पुस्तकाला ‘आपलं पुस्तक’ म्हणत्येय? मला गहिवरून आलं. अशा जिव्हाळ्याचा मला मुळीच अनुभव नव्हता. तोही माझ्या दैवताकडून आलेला पाहून माझा गळा दाटून आला. महप्रयासानं मी माझे अश्रू आवरले. ‘यादों की बारात’च्या चार आवृत्या निघाल्या. लताचा आशीर्वाद व पायगुण.

पुस्तकाचं प्रकाशन करायला येण्याचेही तिनं कुठलेही आढेवेढे न घेता मान्य केले. माझा कानावर विश्वासच बसेना. त्या दिवसात माझे ग्रह फारच उच्चीचे असावेत. लता प्रकाशनाला येत्येय कळल्यावर माझा एक मित्र म्हणाला, ‘ती तुझी ‘गॉडमदर’ आहे.’

मी आधी चमकलो व मग कमालीचा सुखावलो. दैवत आणि भक्त या नात्यापेक्षा मला ‘गॉडमदर’ व ‘गॉडसन’ हे नातं जास्त लुभावून गेलं. मी आईला किती ‘मिस्’ करीत होतो हे त्या दिवशी मला कळलं. मी पिसाटल्यासारखा तयारीला लागलो. लता येत्येय म्हटल्यावर जादूची कांडी फिरली होती. मी करणार होतो त्या ‘स्लाइड शो’ची ट्रायल करून घरी परतलो तर माझ्या डोक्यावर बर्फाची शिळा आदळली. लताला ताप आलाय व ती येऊ शकणार नाही, असा तिच्या घरून फोन आला होता. मी खचलो. आता? मी हाताला लागतील ते कपडे घातले व मोटारसायकल काढून थेट लताच्या घराचा रस्ता धरला. त्यानं काय फरक पडणार आहे मला कळत नव्हतं, पण हातावर हात धरून निक्रिय घरी बसणेही मला शक्य नव्हते.

‘दीदी, विश्रांती घेतायत पण त्या कार्यक्रमाला निश्चित येतायत.’ मला सांगण्यात आले.

तिच्या घरून मी थेट रवींद्र नाट्यमंदिराला पोहोचलो. तिथं माझ्या लक्षात आलं की आपण शोभेसे कपडे घातलेले नाहीत. घरी जाऊन कपडे घालून येण्याइतका वेळही नव्हता. मी बाहेरच्या पायऱ्यांवर लताची वाट बघत घुटमळत होतो. ‘तू जो नही है तो कुछ भी नही है’ हे एस. बी. जॉनचं गाणं माझ्या मनात वाजत होतं. माझ्या छातीत धडधडत होतं. ती आलीच नाही तर मी काय करणार होतो? मी आधी हा विचार केलाच नव्हता. आताही मी तो करू इच्छित नव्हतो. शहाणी माझी बाय ती. ये ग येss तोच रवींद्रच्या गेटमधून लताची गाडी आत शिरली. मी धावलो.

‘आप बाहर क्या कर रहे है?’ गाडीतून उतरता उतरता तिनं हिंदीतून विचारलं.

‘आज काय एकदम हिंदी?’ मी विचारलं. ती आल्यानं मला जो काय रिलीफ मिळाला होता त्यानंतर ती कानडी, स्वाहिली, चिनी, जपानी कुठल्याही भाषेत बोलली असती तरी मला चालणार होतं.

“आपल्या पुस्तकाचं नाव ‘यादों की बारात’ हिंदी आहे म्हणून’’ ती प्रसन्नपणे म्हणाली.

टाळ्यांच्या कडकडाटात आम्ही आत गेलो.

राजेश खन्ना ऊर्फ काकाजीचा फोन वाजला. (तुझा फोनही इतर कोणाच्या फोनसारखाच वाजतो, असं त्याला चिडवणं राहून गेलं.)

‘आज जेवायला ये.’ तो तुटकपणे बोलला. तो फोनवर असंच बोलायचा. आज मला दुसरं काही काम असू शकेल का, आज मला यायला जमेल का, आज माझ्याकडे कोणी येणार आहे का, असले फिजूल प्रश्न त्याला पडत नसत. त्याच्या डोक्यात आलं, त्यानं फोन उचलून घुमवला. आज त्याला पंगतीला मी हवा होतो. हवा होतो म्हणजे हवा होतो. बात खतम. राजेश खन्नाचे बोलावणे म्हणजे देवाचं बोलावणं. ते कोणी टाळू शकेल असं त्याला वाटतच नसे.

मी क्षणभर घुटमळलो, माझ्या घुटमळण्याचा अर्थ अचूक ताडत तो म्हणाला, ‘ग्यारह साडेग्यारह बजे घरसे कुछ खाके निकलना.’

त्याची दोन ही जेवणाची वेळ मला झेपत नाही हे त्याला पक्कं माहीत होतं. माझ्यासाठी (किंवा कोणासाठीही) जेवणाची वेळ बदलणं त्याला शक्य नव्हतं. एवढी किंमत तो कोणालाही देत नसे. ‘काका’बरोबर ‘काका’चं जेवणं जेवायचं असेल तर दोन वाजता यायचं. कुठून तरी पुडाचा म्हणतात तो भलामोठा डबा यायचा. एका भांड्यात चमचमीत मटण, एका भांड्यात रगमगीत चिकन, एका भांड्यात मटण किंवा चिकन बिर्याणी, एका भांड्यात पापलेटाचं कालवण, एका भांड्यात भात. त्याचा नोकर कोशिंबीर, पापड व गरमागरम फुलके करायचा. तो दाक्षिणात्य बालकिशन आहे अशी माझी समजूत होती. तो चक्क रत्नागिरीचा बाळकृष्ण निघाला. तो माझ्याशी मराठीतून बोलला तेव्हा कळलं.

जेवणाचा नुसता घमघमाट सुटायचा. नुसतं पाहूनच तोंडाला पाणी सुटायचं. राजेश खन्नाचं जेवण म्हणजे रोजचीच पार्टी होती.

‘मी आज यातलं काही खाऊ शकणार नाही.’ मी निक्षून म्हणालो.

‘का?’ त्यानं चमकून विचारलं.

‘आज सोमवार आहे.’

‘बरं मग?’

‘सोमवारी आम्ही मांसाहार करत नाही.’

‘का पण?’

‘पिढ्यान्पिढ्या हे चालत आलंय.’

‘ठीक आहे. वार बदल. यापुढे मंगळवारी खात जाऊ नको. घे ती डिश.’

मला तो व त्याला मी आडमुठे वाटत होतो. मी खाणार नाही हे एकदा कळल्यावर तो हतबुद्ध झाल्यासारखा वाटला. त्यानं डब्यातलं आणखी एक भांडं उघडलं. त्यात तुकडे केलेले उकडलेले बटाटे होते. त्यांना तिखटमीठही लावलेले नव्हते.

‘हे काय?’ मी आश्चर्यानं विचारलं.

उत्तर देणं काकाजीच्या अक्षरशः जिवावर आलं होतं. त्याची अवस्था बघवत नव्हती. उंदीर अडकलेला पिंजरा पाण्यात बुडवल्यासारखं काहीतरी झालं होतं. शेवटी बालकृष्णनं मला सांगितलं. ‘साहेब, तुम्हाला पोटाचे विकार आहेत ना, म्हणून काकाजींनी खास तुमच्यासाठी असे बटाटे करायला सांगितले. तुम्ही काहीच खाल्लं नाहीत तर तुमची उपासमार होऊ नये म्हणून…

मी राजेश खन्नाकडे बघितले. आपल्या स्वभावातली ही प्रेमळ बाजू उघडकीस आलेलं त्याला बिलकूल रुचलं नव्हतं. ‘सुपरस्टार’नं एका सामान्य माणसाची इतकी काळजी घेणं शोभतं का?…

shireesh.kanekar @gmail.com

आपली प्रतिक्रिया द्या