युगल गीतातील तलत महमूद

235

धनंजय कुलकर्णी

रसिकांवर मखमली स्वरांनी जादू करणाऱ्या तलत महमूद यांनी चित्रपटसंगीताचा एक काळ गाजवला. या काळातील त्यांची युगलगीतं खास लोकप्रिय ठरली. त्यांच्या स्वरातील दिलचस्प युगलगीतांच्या गोडीचा पुनश्च अनुभव देणारा हा लेख.

talatmahmood_216

सिनेमाच्या सुवर्णकाळातील गाणी आणि तो माहौल अजूनही रसिकांना मोहित करतो. काळ जसजसा पुढे जातो आहे तसतसे मन मात्र जुन्या संगीताकरिता हळवे होत जात असते. अशीच एक हळवी जखम म्हणजे तलत महमूदची गाणी. आज इतकी वर्ष झाली तरी ‘रात ने क्या क्या ख्वाब दिखाये’, ‘जिंदगी देनेवाले सुन तेरी दुनिया से दिल भर गया’,’ जलते हैं जिसके लिये तेरी आँखो के दिये’, ‘फिर वही शाम वही गम वही तन्हाई हैं दिल को समझाने तेरी याद चली आयी हैं’ ही गाणी ऐकली की मन सैरभैर होतं. तलतच्या स्वराने आणि गीतांनी कित्येक वर्षांपूर्वी मनावर केलेलं गारुड आजही कायम आहे. असं म्हणतात परमेश्वराने प्रेम करण्यासाठी मानवी शरीरात हृदयाची निर्मिती केली, पण प्रेमात सर्वांनाच यश मिळेल याची काय खात्री? मग अशा प्रेमातील अपयश सहन करण्याची ताकद देण्यासाठी परमेश्वरानेच पुन्हा पृथ्वीतलावावर तलतला पाठविले. तलतने तमाम प्रेमभंगातील समूहासाठी चिक्कार गाणी गाऊन त्यांच्या दुःखाला काही क्षणासाठी तरी आधार दिला. मग ‘एक मैं हूं एक मेरी बेकसी की शाम हैं’, ‘शामे गम की कसम आज गमगीन हैं हम आ भी जा आ भी जा आज मेरे सनम’ आणि ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहां कोई न हो’ ही गाणी मग अमृतांजनासारखी शीतल सुखद वाटू लागली. ९ मे रोजी तलतच्या निधनाला २० वर्षे पूर्ण झाली. मखमली स्वराच्या या गायकाचे स्मरण करताना त्यांच्या स्वरातील युगलगीतांची एक वेगळीच दिलचस्प, मनोहारी दुनियेची सफर करूया.

तलत (जन्म : २४ फेब्रुवारी १९२४) आधी कोलकोत्याला गैरफिल्मी गाणी, गजल गाऊन प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी तो तपनकुमार या नावाने गात असे. ‘तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेंगी’, ‘सब दिन एक समान नही था’ या गजल ऐकून रसिक या नव्या स्वराने मोहित झाले होते. आज आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत ते त्यांच्या समकालीन गायिकांसोबतची युगल गीतांची! पन्नासचे दशक तलतकरिता आजही आठवले जाते. तलतचा स्वर हा खूपच मधाळ, मखमली काहीसा कंपयुक्त आणि भावस्पर्शी होता. लता आणि आशासोबत हा स्वर खूप खुलला. इतर गायिकांसोबत गायलेल्या युगलगीतांचा विचार करताना गीता दत्तसोबतची दोन गाणी लगेच डोळ्यांपुढे येतात. राज कपूर-नर्गीस यांच्या ‘जान पहचान’ या चित्रपटातील ‘अरमान भरे दिल की लगन तेरे लिये हैं’ हे ते अप्रतिम गीत. या दोघांचे आणखी एक गीत जे एके काळी ‘रेडिओ सिलोन’चे लाडके होते ते म्हणजे ‘कह रही धडकने पुकार कर’ गीताचा लाडिक स्वर आणि त्यावर तलतच्या मखमली स्वराची महिरप क्या कहना! त्या मानाने शमशाद बेगम काहीसा आक्रामक झणझणीत स्वर जेव्हा ‘बाबूल’ ( सं. नौशाद ) मध्ये ‘ मिलते ही आँखे दिल हुआ दिवाना किसीका’ आणि ‘दुनिया बदल गई मेरी दुनिया बदल गई’ तलतच्या स्वरासोबत येतो तेव्हा त्याला निराळीच रंगत येते. सुरैयासोबत तलत ‘वारीस’ या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत होता. अनिल विश्वास यांच्या संगीतात हे दोन स्वर जेव्हा ‘राही मतवाले तू छेड एकबार मन का सितार जाने कब चोरी चोरी आयी हैं बहार’ तेव्हा एक अप्रतिम युगलगीत बनते. पहिल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या हिंदी चित्रपटात ‘मिर्झा गालिब’ (१९५४ सं. गुलाम महंमद) या दोघांचे एक गीत होते ‘दिल ए नादान तुझे हुआं क्या है आखिर इस दर्द की दवा क्या है’ मस्त जमून आलं होतं. तसेच ‘मालिक’ (१९५८) या सिनेमातील ‘मन धीरे धीरे गाये रे मालूम नही क्यू’ हे गाणे आजही लख्ख आठवते. तलतने इतर समकालीन गायिका म्हणजे जोहराबाई अंबालीवाला, राजकुमारी, सुपर्वा सरकार, प्रेमलता, सुमन कल्याणपूर, उषा मंगेशकर, हेमलतासोबत गाणी गायली, पण त्याच्या स्वराची खरी जोडी जमली ती आशा आणि लतासोबतच!

तलत-आशाची ४८ युगलगीते आहेत. १९५६ सालच्या ‘इन्साफ’(सं. चित्रगुप्त) मधील ‘दो दिल धडक रहे है और आवाज एक है नगमे जुदा जुदा मगर साज एक है’ हे नितांत सुंदर गीत होतं. (हे गाणे पडद्यावर अजित आणि नलिनी जयवंतवर चित्रित होते). तलतच्या गाण्याचे हेच वैशिष्टय़ आहे की त्याची गाणी लक्षात राहतात ते तलतची गाणी म्हणून! नायक कोण चित्रपट कोणता हे तपशील इथे गौण ठरतात. ‘मस्त कलंदर’ या चित्रपटातील हंसराज बहल यांचे ‘दिले नादान जमाने में मोहब्बत एक धोखा है ये’ या गीतात आशाचा स्वर असा काही लागलाय की ऐकताना आजही मन भावूक होतं. इस्मत चुगताई यांच्या कथेवर एक चित्रपट १९५७ साली आला होता ‘सोने की चिडीया’ ज्यात साहिरची ओपीने स्वरबद्ध केलेली अप्रतिम गजल होती, ‘प्यार पर बस तो नही हैं मेरा लेकीन मुझको तू बतादे मै तुझे प्यार करू या न करू’.

लतासोबतची तलतची गाणी रसिकांकरिता मधुर आठवणींचा कोश आहे. या दोघांचे सर्वात सुंदर गीत आणि खरं तर एकूणच युगलगीतातील अप्रतिम गीत म्हणजे ‘तराना’ (सं. अनिल विश्वास) चित्रपटातील प्रेम धवनने लिहिलेले ‘सीने में सुलगते है अरमां आंखो में उदासी छायी है ये आज तेरी दुनियासे हमें तकदीर कहां ले आई हैं…’ आज इतकी वर्षे झाली तरी या गीताची जादू तसू भरही कमी होत नाही. यमन रागावरील ही रचना अनंत काळापर्यंत अशीच चिरतरुण राहील. या गीतावर एक उदास छाया असली तरी याच चित्रपटातील ‘नैन मिले नैन हुये बावरे’ या गीतात पहिल्या नवथर प्रेमातील हर्षोल्हास आहे. सी. रामचंद्र लता आणि तलत हे कॉम्बिनेशनदेखील बेफाम होते. या त्रयीची ही गाणी पहा. तुम अपनी याद भी दिलसे भुला जाते तो अच्छा था (यास्मिन), अपनी कहो कुछ मेरी सुनो क्या दिल का लगाना भूल गये (परछाईया),तेरे रास्ते पे हमने एक घर बना लिया हैं (कवी), किसे मालूम था इक दिन मुहोब्बत बेजुबा होगी (साकी).

मदनमोहन यांचे दोन लाडके स्वर होते लता आणि तलत. त्यांची युगलगीते त्यामुळे इथे आणखी झळाळून दिसतात. तेरी चमकती आंखो के आगे ये सितारे कुछ भी नही(छोटी बहू), ये नई नई प्रीत है तुही तो मेरा मीत है (पॉकेटमार), ऐ सनम आज ये कसम खाले (जहाँआरा), तुम्ही तो मेरी पूजा हो (सुहागन). सलीलदा जेव्हा या दोघांना घेऊन गाणी बनवायचे तेव्हा त्यात नैसर्गिक गोडवा आणि गेयता यायची. अहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये (उसने कहां था), इतना न मुझसे तू प्यार बढा के मै एक बादल आवारा (छाया). संगीतकार वसंत देसाई यांच्याकडे गायलेले एक युगलगीत आपल्या राजा गोसावीवर चित्रित होते. चित्रपट होता ‘स्कूल मास्तर’ आणि गीताचे बोल होते ‘ओ दिलदार बोलो एकबार क्या मेरा प्यार पसंद है तुम्हे.’ याच संगीतकाराकडे ‘टीम टीम तारोके दीप जले नीले आकाश तले (मौसी) गे गाणे अद्याप रसिकांच्या लक्षात आहे. या दोघांची काही आणखी लोकप्रिय गाणी पहा. दिल में समा गये सजन फूल खिले चमन चमन (संगदिल-सज्जाद) ‘जब जब फूल खिले तुझे याद किया हमने’ (शिकस्त-एस. जे.), भूल जा सपने सुहाने भूल जा (राजधानी-हंसराज बहल), आसमांवाले तेरी दुनिया से दिल भर गया (लैला मजनू – गुलाम महंमद), लता-तलताची एकूण ६६ युगलगीते आहेत. त्यातील केवळ लोकप्रिय गीतांचा उल्लेख इथे आहे.

अतिशय उच्च दर्जाची काव्य त्याला ज्याला रिच पोएट्री म्हणता येईल असे त्याला गायला मिळाले. त्याच्या गैरफिल्मी गजल आणि गीतांची आणि सोलो गीतांची एक वेगळीच विलोभनीय अशी सुंदर ती दुसरी दुनिया आहे. त्याबाबत पुन्हा कधी तरी. तलत अतिशय श्रेष्ठ दर्जाचा गायक पण लताने म्हटल्याप्रमाणे ‘सुगंधी उदबत्तीसारखा लवकर विझून गेला.’ १९६४ सालच्या ‘जहांआरा’नंतर पुढची ३५ वर्षे तो सिनेसृष्टीपासून अलिप्त होता. ही त्याची स्वेच्छानिवृत्ती नक्कीच नव्हती. त्याला जाऊनदेखील २० वर्षे झाली मात्र तलतला विसरणे शक्यच नाही. कारण तो आमच्या दिलात कायमचा विसावला आहे!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या